मोहन बोराडे
परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील सोनवटी येथील युवा शेतकरी विराज अंबादास सोळंके यांनी आपल्या शेतामध्ये 'झुकिनी' या विदेशी भाजीपाला पिकाची लागवड करून अल्पावधीतच लाखो रुपयांचा नफा कमवला आहे.
झुकिनी हे काकडी सारखे दिसणारे परंतु, टेबल पर्पज खाण्यासाठी वापरणे जाणारे पीक असून, मोठ्या शहरांमध्ये विशेषतः मुंबई, पुणे नागपूर यासारख्या शहरांमध्ये या पिकाची मागणी आहे.
विराज अंबादास सोळंके हे नूतन महाविद्यालय येथे संगणकशास्त्रामध्ये पदवीचे शिक्षण घेत असून, ते वडील अंबादास सोळंके यांना शेतकामांमध्ये मदत करतात. मागील वर्षी बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनादरम्यान त्यांना 'झुकिनी' या पिकाची माहिती झाली.
त्यांनी १ एकरवर डिसेंबरच्या सुरुवातीला लागवड केली. लागवड करतेवेळेस त्यांनी एकरी ४ हजार झाडांची ठिबक सिंचन करून बेडवर लागवड केली.
झुकिनी या पिकाचे पुढील ४० ते ५० दिवस या पिकापासून तोडे निघतात. विराज सोळंके यांना दोन महिन्यांमध्ये दहा टन एवढे उत्पादन मिळाले. त्यांनी पुणे येथे एका व्यापाऱ्याशी करार पद्धतीने प्रतिकिलो ३० रुपये प्रमाणे विक्री केली यातून त्यांना तीन लाख रुपये मिळाले.
कृषी विभागाचे तांत्रिक मार्गदर्शन
झुकिनी पिकाचा लागवड खर्च म्हणजे, जमीन तयार करणे, लागवड, ठिबक सिंचन, रोग व्यवस्थापन व वाहतूक असा त्यांना दीड लाख रुपयापर्यंत खर्च झाला. खर्च वजा जाता निव्वळ दीड लाख रुपये नफा सोळंके यांना मिळाला. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी पिकाची पाहणी करून कीड रोगाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले.
इतर शेतकऱ्यांना लागला लळा
सद्यःस्थितीमध्ये गावातील इतर दोन शेतकऱ्यांनीसुद्धा झुकिनी या पिकाची लागवड सुरू केली आहे. झुकिनी हे पीक फायदेशीर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळायला हरकत नाही, असे विराज सोळंके यांनी सांगितले.
दीड लाखाचा निव्वळ नफा
शेतमशागतीपासून ते लागवड, विविध कीड रोगांचे नियंत्रण, सिंचन, खतांचे योग्य प्रमाण बाजारपेठेचा अचूक अंदाज घेत सोळंके यांनी पिकावर केलेला खर्च वजा करता दीड लाखाचे निव्वळ उत्पन्न मिळविले.
दोन महिन्यांमध्ये दहा टन उत्पादन
एक एकर क्षेत्रावर 'झुकिनी'ची डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला लागवड केली. योग्य नियोजन केल्याने अवघ्या ३५ दिवसांनंतर उत्पादन सुरू होते. दोन महिन्यांमध्ये १० टन एवढे उत्पादन मिळवित इतर शेतकऱ्यांचे लक्ष त्यांनी वेधले.
हेही वाचा : ऑनलाईन माहिती घेत रणजित करताहेत शेती; १० गुंठे क्षेत्रात झाली अडीच लाखांची पपई