रविंद्र शिऊरकर
कोरडवाहू, दुष्काळी मराठवाड्यातली जमीन. पावसाच्या लहरीवर वाढलेलं पीक जगवता जगवता शेतकऱ्याचा जीव मेटाकूटीला आलेला. अशा मातीत बागायती शेती जगवायची म्हणजे जिकिरीचं काम. त्यात छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्याने आणि त्याच्या पत्नीने दुसऱ्याच्या शेतातून पाणी डोक्यावर आणत मोसंबीची झाडं जगवली आहेत, तीही कोणतीही रासायनीक खतांच्या भडीमाराशिवाय!
शिक्षण जेमतेम. मुलांना मात्र, चांगले शिकवत अभियांत्रिकीच्या महाविद्यालयात परगावी पाठवले. जबाबदाऱ्या मार्गी लावत गावी येऊन शेती करण्याचा निर्धार वैजापूरच्या बळीराम वाघ यांनी केला. एकीकडे बँक अधिकाऱ्यांच्या गाडीसाठी ड्रायवर म्हणून काम करत, पत्नी लता वाघ यांनी खानावळीची जोड दिली. गावाकडे आल्यानंतर ५ एकराच्या एका गटात मोसंबीची लागवड केली. कोरडवाहू जमिनीतही सेंद्रिय शेतीची कास धरता येते हे दाखवलंय छ़पती संभाजीनगरच्या शेतकऱ्याने.
मुले नोकरीच्या मार्गाला लागल्यानंतर वाघ दाम्पत्य आपल्या गावी धोंदलगाव येथे २०१६ ला परतले घरची दोन गटात ५-५ विभागलेली १० एकर शेती करण्याचे त्यांनी ठरवले. मात्र, यात लता यांनी आग्रह केला तो सेंद्रिय शेतीचा. मग ५ एकर च्या एका गटात मोसंबी बाग करण्याचे ठरले. तर उर्वरित ५ एकर मध्ये पारंपरिक शेती व तीही सेंद्रिय पद्धतीने करण्याचे ठरले. त्याप्रमाणे वाघ यांनी विविध शासकीय व खासगी संस्था, कार्यालय, व्यक्तींना भेटून माहिती गोळा करत बारामती येथून न्यू शेलार कॉटन गोल्ड या जातीच्या ११३० मोसंबी कलमांची आपल्या शेतात १५ × १५ फूट अंतरावर लागवड केली. २९ जुलै २०१८ रोजी लागवड केलेल्या या बागेला त्याच वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागला तेव्हा वेळी आपल्या पत्नी समवेत बळीराम यांनी दुसऱ्यांच्या शेतातून डोक्यावर पाणी वाहत ही झाडे जगवली.
खत व्यवस्थापन व कृषी विज्ञान केंद्राचे सहकार्य
पूर्णपणे सेंद्रिय शेती करताना वाघ यांनी एकरी १२ ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत वार्षिक एकदा टाकले. सोबत झाडांना गांडूळ खतांचे आच्छादन केले. तसेच निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क यांच्या ते फवारणी करतात. या सर्व व्यवस्थापनात कृषी विज्ञान केंद्र गांधेली छत्रपती संभाजीनगर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत असल्याचे व तेथील अधिकारी वारंवार मदतीला येत असल्याचे वाघ सांगतात.
आंब्या व मृग बहार
चार वर्षांची बाग झाल्यापासून या बागेतून आंब्या व मृग असे वार्षिक दोन बहार घेतले जातात. ज्यामध्ये २०२२ मध्ये ३६ टन उत्पन्न मिळाले असून त्याला १८ ते २२ दर मिळाला. तर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये घेतलेल्या शेवटच्या बहरात ५२ टन मोसंबीचे उत्पन्न मिळाले असून यांस २५ रुपये असा दर मिळाला. सरासरी खर्च वजा जाता या मोसंबी फळबागेतून वाघ यांना वार्षिक १० ते १५ लाखांचे उत्पन्न मिळते.
आंतरपिके व सिंचन
बाग लागवड केल्यानंतर कृषी विभाग वैजापूर यांच्या सहकार्याने भाऊसाहेब फुंडकर योजनेतून वाघ यांना काही अनुदान प्राप्त झाले ज्या पैश्यांतून त्यांनी आपल्या दुसऱ्या गटाच्या शेत विहरीतील पाणी या बाग असलेल्या शेतात पाईपलाईन द्वारे आणले असून सोबत सलग चार वर्षे त्यांनी कांदा, सोयाबीन, खिरा, डांगर, असे आंतरपिके घेतली. सेंद्रिय कर्ब जमिनीत तयार झाल्याने आता मातीची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढल्याने कमी पावसाचा भाग असून देखील बाग व्यवस्थित असल्याचे वाघ सांगतात.
गोपालन व गांडूळ खत निर्मिती
वाघ यांनी एका गीर गाईचे संगोपन केले असून गाईपासून मिळणाऱ्या शेण व उरलेल्या चाऱ्यापासून ते गांडूळ खत निर्माण करतात. ज्यासाठी त्यांनी बाजारातून प्लास्टिकचे बेड आणले आहे. यातून तयार होणारे गांडूळ खत ते शेतात बागेसाठी वापरतात तसेच वर्मी वाशची ते फलबागेसाठी ड्रिंचिंग करतात.