भारत सरकार जर म्हणत असेल सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी गुणवत्तेत काकणभर अधिकच चांगली आहे. अन् मंगळवेढ्याच्या ज्वारीला जीआय मानांकन देऊन सोलापूरची ज्वारी गुणवत्तेची असल्याचे शिक्कामोर्तब करीत असेल.. केंद्र सरकार सोलापूर जिल्ह्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योगासाठी ज्वारीची निवड करीत असेल. एवढेच काय केंद्र सरकारने १९९१ मध्ये सोलापुरात सुरू केलेल्या रब्बी ज्वारी कोरडवाहू संशोधन केंद्राचे २०१४ मध्ये भारतीय तृणधान्य संशोधन संस्थेत रूपांतर केले.
गुणवत्तेच्या ज्वारी उत्पादनात देशातीलच काय राज्यातील इतर जिल्ह्यातील कोणीही सोलापूरच्या शेतकऱ्यांचा हात धरू शकत नसल्याने राज्य शासनाने मागील वर्षीच्या बजेटमध्ये मिलेट सेंटर सोलापुरात मंजूर केले. यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील गुणवत्तेच्या ज्वारी उत्पादनातून ज्वारी प्रक्रिया उद्योगाचा ब्रँड बनत आहे; मात्र विनाकारण सोलापूरचे 'मिलेट सेंटर' हलवून सोलापूरच्या गुणवत्तेच्या ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना हिणवले जात आहे..!
यंदा पावणेतीन लाख हेक्टर ज्वारी..
यावर्षी राज्यात सर्वाधिक दोन लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रात ज्वारी पेरणीची नोंद सोलापूर जिल्ह्यात झाली आहे. त्यानंतर एक लाख फरकाने कमी पेरणी अहमदनगर जिल्ह्यात, धाराशिव व बीड जिल्ह्यात प्रत्येकी दीड लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारी पेरली आहे. सांगली जिल्ह्यात एक लाख १० हजार तर पुणे जिल्ह्यात ८० हजार हेक्टर क्षेत्रात ज्वारी पेरणीची नोंद आहे. म्हणजे सोलापूर व लगतच्या धाराशिव, बीड, अहमदनगर, सांगली जिल्ह्यातच प्रामुख्याने ज्वारीचे क्षेत्र असल्याचे कृषी खात्याकडील नोंदीवरुन दिसत आहे. मग गैरसोयीचे होईल अशा ठिकाणी मिलेट ट्रेनिंग सेंटर हलविण्यापेक्षा सोलापूर लगत मिलेट सेंटर होणे आवश्यक आहे.
नवनवीन ज्वारीचे वाण विकसित होतीलही; मात्र मालदांडी, दगडी, गुळभेंडी नाही सोलापुरी उत्पादित ज्वारी आजही आहारात सरस ठरत आहे. ज्वारीचे जे नवे वाण विकसित होताहेत तेही सोलापूर येथील राष्ट्रीय रब्बी ज्वारी कोरडवाहू संशोधन केंद्रातच, अगोदर केवळ खाण्यासाठीची ज्वारी आज पोहे, चिवडा, बिस्किट, बटर बिस्कीट, गावरान तुपाची व गुळाची बिस्किटेच काय इथेनॉलही देऊ लागली आहे.
अधिक वाचा: १६ हजार कंटेनरची निर्यात; २२०० कोटीची उलाढाल करणारा 'सोलापूरी केळी पॅटर्न'
यातून ज्वारीवर उद्योग सुरू होत असल्याने मार्केटिंगच्या दृष्टीने मिलेट ट्रेनिंग सेंटरची गरज निर्माण झाली आहे. राळे, भगर, ज्वारी, राजगिरा, नाचनी, वरई, बाजरी सोलापुरात होताना दिसत नाही. तृणधान्यावर आता प्रक्रियेतून अनेक खाद्यपदार्थ बनू लागले यापासून इडली पीठ, आम्लेट शिवाय इतरही खाद्य पदार्थ तयार होत आहेत. यामुळेच ज्वारी अनेक अंगाने बहुउपयोगी ठरू लागली आहे.
पेरणीपासून काढणीपर्यंतचे तंत्र इथल्या शेतकऱ्यांना पिढ्यान्पिढ्या जमले आहे. याशिवाय सोलापूरच्या मातीचा कसदारपणा ज्वारीत उतरत असल्याने दगडी, मालदांडीची चव काही कमी होत नाही. कृषी शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून देशभरातून ज्वारीवर संशोधन केंद्रासाठी सोलापूर हे ठिकाण निवडले गेले. त्यातूनच हैदराबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च सेंटरचे उपकेंद्र सोलापूर येथे कार्यान्वित झाले. आता मिलेट सेंटर व मिलेट ट्रेनिंग सेंटर असा फरक दाखवून सोलापूरचे मंजूर मिलेट सेंटर बारामतीला हलविले जात आहे. गरज कुठे तसेच सोयीचे कोणत्या ठिकाणी होईल, याचा विचार सरकारकर्त्यांनी करायला हवा.
सर्वाधिक उद्योग सोलापूर जिल्ह्यातून
■ ज्वारीवर प्रक्रिया करणारे लहान-मोठे सर्वाधिक उद्योग सोलापूर जिल्ह्यातून उभारले आहेत. अन्न प्रक्रिया उद्योगाची नोंद असलेल्या राज्य शासनाकडे याचीही नोंद आहेच.
■ राज्यात ज्वारीपासून जेवढे प्रक्रिया उद्योग आहेत त्यापैकी ५० टक्के उद्योग एकट्या सोलापूर जिल्ह्यात असल्याची आकडेवारी कृषी खात्याची आहे.
- अरुण बारसकर