जिल्ह्यात पुस्तक, मध आणि नाचणीचं गाव असताना फलटण तालुक्यातील धुमाळवाडीला फळांच गाव म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यामुळे धुमाळवाडी महाराष्ट्रातील पहिलंच गाव ठरलं असून, यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. धुमाळवाडीत तब्बल १९ प्रकारची फळे पिकतात.
सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभला आहे. त्याचप्रमाणे आता फळांनी समृध्द असणारा जिल्हा म्हणूनही सातारा पुढे आला आहे. कारण, जिल्ह्यात आज विविध ३० प्रकारची फळे शेतकरी घेत आहेत. यामधून मोठ्या प्रमाणात अर्थार्जन होत आहे. याच जिल्ह्यात अनेक गावे वेगळी ओळख निर्माण करत आहेत. त्यातील महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकाचं गाव म्हणून देशपातळीवर नावाजलं आहे. याच तालुक्यातील मांघर हे मधाचं गाव आणि जावळी तालुक्यातील कुसुंबी नाचणीचं गाव म्हणून जाहीर झालेलं आहे. सातारा जकातवाडी हे कवितांचं गाव ठरलं. याच पंक्तीत फलटण तालुक्यातील धुमाळवाडी गाव आलं आहे.
धुमाळवाडीला फळांचं गाव म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे धुमाळवाडी महाराष्ट्रातील फळांचं पहिलं गाव ठरलं आहे. त्याचबरोबर आता गावाची नवीन ओळख निर्माण झाली आहे. या गावात सध्या विविध १९ प्रकारची फळे घेण्यात येतात. यामध्ये पेरू, सीताफळ, डाळिंब, आवळा, चिंच, अंजिर, केळी, जांभूळ, ड्रॅगनफ्रूट, द्राक्षे, चिकू, लिंबू, संत्री, बोर, नारळ, आंबा, पपई अशी फळे घेतली जातात. तसेच या फळांचा समावेश सलग लागवडीत आहे. बांधावर सफरचंद, स्टारफ्रूट, लिची, काजू, फणस, करवंद, खजूर या फळझाडांचीही लागवड केलेली आहे. या गावाने मेळावे, प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाखाली फळबाग लागवडीच क्षेत्र वाढवलेले आहे. त्याचबरोब फळबागांमुळे उत्पादन मिळत आहे तसेच फळप्रक्रिया उद्योग, फळांच निर्यात यामध्ये गावाची झपाट्याने प्रगती होत आहे. यातून शेतकऱ्यांचं अर्थकारण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्याचबरोबर आता गावातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ घेऊन नवउद्योजक तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
गावाची माहितीलागवडी योग्य क्षेत्र - ३७१ हेक्टरफळबाग लागवड क्षेत्र - २५९ हेक्टर
फलटण तालुक्यातील धुमाळवाडी हे फळांचं गाव म्हणून जाहीर झालेल आहे, त्यातून तरुणांना मोठ्या प्रमाणात फळांचे उत्पादन, निर्यात करण्यासाठी प्रेरणा मिळेल तसेच कृषी विभागाच्या माध्यमातूनही गावातच प्रक्रिया उद्योग आणि कृषी पर्यटन विकास होण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येत आहेत. - भाग्यश्री फरांदे -पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी