Join us

शेतीत काय पिकतंय, त्यापेक्षा बाजारात काय विकतंय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 12:24 PM

शेतीत काय पिकतंय, त्यापेक्षा बाजारात काय विकतंय, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेतीत नवनवीन प्रयोग करणारे वांगी (ता. कडेगाव) येथील प्रयोगशील शेतकरी रत्नराज जाधव आणि रत्नदीप जाधव यांनी दोन एकर ३० गुंठे क्षेत्रात सुपारी व नारळाची बाग केली आहे.

मोहन मोहितेवांगी : शेतीत काय पिकतंय, त्यापेक्षा बाजारात काय विकतंय, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेतीत नवनवीन प्रयोग करणारे वांगी (ता. कडेगाव) येथील प्रयोगशील शेतकरी रत्नराज जाधव आणि रत्नदीप जाधव यांनी दोन एकर ३० गुंठे क्षेत्रात सुपारी व नारळाची बाग केली आहे.

अननस, चेरी, जाम फ्रूट, सफरचंद, पेरू, काश्मिरी पेर, आंबा, काजू, जांभूळ अशी फळझाडे तर वेलची, मिरी, लवंग, दालचिनी अशा मसाल्याच्या झाडांची लागण केली आहे. नारळ व सुपारीच्या बागेत केळीचे आंतरपीक करून २० लाख रुपये मिळवले आहेत. रत्नदीप जाधव यांनी एमए व ग्रंथालयशास्त्राची पदवी घेतली आहे. त्यांना १८ एकर जमीन आहे.

वडिलांच्या निधनानंतर शेतीची सर्व जबाबदारी धाकटे बंधू रत्नराज जाधव यांच्यावर आली. त्याची शेतीतील धावपळ पाहून रत्नदीप यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दोन एकर ३० गुंठे क्षेत्रावर ऊस पिकाला पर्याय म्हणून नारळ व सुपारी याची लागवड केली.

नारळ व सुपारीबरोबरच केळी हे आंतरपीक घेतले. त्यानी ६० गुंठे बागेत 'जी-९' या जातीच्या दोन हजार ५०० केळीच्या रोपांची लागवड केली होती. त्यांनी रोपांना स्वतः तयार केलेले गांडूळ खत, शेणखत व कंपोस्ट खत देऊन चांगल्या प्रकारे केळी उत्पादन काढले आहे. केळीच्या प्रत्येक घडाचे वजन हे ४५ ते ५० किलो होते. ६० गुंठ्यांमध्ये १०० टन केळीचे उत्पादन झाले.

या केळीची निर्यात इराणला झाल्यामुळे त्यांना दोन हजार रुपये प्रतिटन असा दर मिळाल्यामुळे २० लाखांचे उत्पादन मिळालेले आहे. जाधव बंधूनी रासायनिक खत कमी वापरल्यामुळे त्यांना ६० गुंठ्यांसाठी दोन लाख रुपये खर्च आला होता. या केळीच्या पिकानंतर जायफळ पिकाचे उत्पन्न घेणार आहे, असे रत्नदीप जाधव यांनी सांगितले.

अधिक वाचा: बारामतीच्या देवकाते बंधूंची निर्यातक्षम विषमुक्त द्राक्ष शेती, दुप्पट उत्पन्नाची हमी

टॅग्स :शेतकरीशेतीफलोत्पादनकेळीइराणपीकफळे