रविंद्र शिऊरकर
शिऊर तालुका वैजापूर जिल्हा छ्त्रपती संभाजीनगर येथील शेतकरी कडूबा जाधव यांना ४ एकर शेती असून पारंपारिक पिके ते घेतात. अल्पभुधारक आणि कमी पाण्याचा परिसर असल्याने उत्पन्नात काही वाढ होत नव्हती. सोशल मिडियात त्यांनी यवतमाळ येथील शेतकरी अमृतराव देशमुख यांनी आपल्या कपाशी शेतात केलेला अमृत पॅटर्न बघितला सखोल माहिती मिळवली आणि तसाच काहीसा प्रयोग आपल्या शेतात करण्याचे ठरविले. हा प्रयोग कडूबा जाधव यांनी काही अंशी यशस्वी देखील केला असून एकरी ३०-३५ क्विंटल कापसाचे उत्पन्न त्यांना यातून मिळेल अशी अपेक्षा आहे. सध्या जाधव यांच्या शेतात कपाशीचे एक झाड सरासरी ८ ते ९ फूट उंचीचे आहे.
जाधव यांचे कपाशी लागवड नियोजन व व्यवस्थापन
जाधव यांनी ४ फूट सरी आड ६ फूट एक सरी या प्रमाणे ४×६ वर १८० दिवसांत उशिराने परिपक्व होणारे बियाण्यांची लागवड केली आहे. दरवर्षी वापरत असलेले किटकनाशक, बुरशीनाशक कपाशीच्या अवस्थेनुसार वापरले असून एकरी १ टेलर शेणखत या शेताला टाकले आहे. पाण्यासाठी ठिबकचा वापर करत झाडांना टोमॅटो सारखं बाबू आणि तारेच्या मदतीने बांधलेले आहे. सध्या तुरळक प्रमाणात वेचणीस कापूस तयार होत असून सरासरी एका झाडाला ३०-३५ फांद्या असून ७०-८० बोंड आहेत. या कपाशी करीता कडूबा जाधव यांना एकरी १२-१५ हजार खर्च आलेला आहे. ज्यात बियाणे, मशागत, लागवड, खते, औषध फवारणी, आदींचा समावेश आहे.
पहिले वर्ष असल्याने ७×५ अमृत पॅटर्न नुसार कपाशी हवी होती मात्र मी ४×६ केली ज्यामुळे सध्या दोन्ही सऱ्या एकमेकांत मिसळल्या आहेत. त्यामुळे अपेक्षित वाढ झाली नाही. त्याचबरोबर खते व औषधी नियोजन आणखी चांगले करत भविष्यात या सुधारणा करून एकरी ५० क्विंटल कापूस काढायचा आहे. - कडूबा जाधव शेतकरी, शिऊर
सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा आणि दुष्काळी भाग म्हणून आमचा यवतमाळ जिल्हा प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उत्पन्न वाढिसाठी शेतात विविध प्रयोग करत असतांना यातच अमृत पॅटर्नला दहा वर्षांपूर्वी सुरुवात केली. सर्वाधिक एकरी ५१ क्विंटल कापूस आम्ही या अमृत पॅटर्न पद्धतीने मिळविला असून कमीतकमी खर्चात चांगले उत्पन्न मिळविण्याचा हा मार्ग आहे. आज देशा सह विदेशातून संपर्क होत असून या शेतकरी हिताच्या पॅटर्न विषयी विचारणा केली जाते. पंतप्रधान नरेंद मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतांना व या वर्षी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते विशेष सत्कार या आमच्या अमृत साठी झालेला आहे. - अमृतराव देशमुख (अमृत पॅटर्नचे सर्वेसर्वा, अंबोडा ता. महागाव जि. यवतमाळ)