संदीप लोणकर
माळशिरस येथील पाच साखर कारखान्यांनी ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाची महत्त्वाची भूमिका बजावत केवळ आर्थिक समृद्धीच नव्हे, तर सामाजिक आणि औद्योगिक प्रगतीलाही गती दिली आहे. या कारखान्यांमुळेच तालुक्यात नंदनवन फुलले आहे.
माळशिरस तालुक्यामध्ये पहिला साखर कारखाना माळीनगर येथे सुरू झाला माळीनगर साखर कारखाना हा भारतातील पहिला शेतकरी मालकीचा कारखाना आहे.
हा कारखाना १९३२ साली सोलापूर जिल्ह्यातील माळीनगर येथे सुरू झाला हा कारखाना सुरू करण्यामागे सासवडच्या माळी समाजाचे अतुलनीय योगदान आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही अनेक अडचणींना तोंड देत हा कारखाना उभा केला.
कारखाना सुरु झाल्यापासून तो शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी वाहतूक करत आहे. माळीनगर साखर कारखाना हा केवळ साखर उत्पादनापुरता मर्यादित न राहता अनेक दुष्काळी भागात सिंचनाची सोय करण्यासाठी पुढाकार घेत आहे. या कारखान्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे.
श्रीपूरमध्ये दूसरा खासगी साखर कारखाना द बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट या कारखान्याची स्थापना १९६५ मध्ये झाली. त्यानंतर हा कारखाना कैलासवासी सुधाकरपंत परिचारक यांनी विकत घेऊन सहकारी तत्वावर पांडुरंग सहकारी साखर कारखाना याची निर्मिती केली.
या कारखान्यामूळे शेतकऱ्यांना आपल्या ऊस पिकाला चांगला भाव मिळू लागला आणि परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या.
अकलूजमधील शंकरनगर येथे तिसऱ्या कारखान्याची स्थापना १९६९ मध्ये झाली. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना या कारखान्यामुळे तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने नंदनवन पुण्यात सुरुवात झाली.
या कारखान्याने शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था उभा करून कृषी उद्योग दूध संस्था शिक्षण संस्था बँका अशाप्रकारे तालुक्यामध्ये सहकारी संस्था उभा करण्यात या कारखान्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे.
माळशिरस तालुक्यामध्ये चौथा साखर कारखाना त्या काळचे गावचे नाव चितळेनगर आताचे सदाशिवनगर येथे चितळे बंधूनी साखर कारखाना हा माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथे होता. हा कारखाना दिवाळखोरीत गेला होता.
शंकरराव मोहिते-पाटील यांनी हा कारखाना स्वतःची जमीन गहाण ठेवून विकत घेतला आणि सहकारी तत्त्वावर सुरु केला. या कारखान्याला श्री शंकर सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखले जाते.
१९६९-७० मध्ये या कारखान्याचा पहिला गळीत हंगाम झाला. माळशिरस तालुक्यातील अर्थकारण सुधारण्यासाठी हा कारखाना सुरू करण्यात आला होता. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात नंदनवनसाठी या कारखान्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
माळशिरस तालुक्यात पश्चिम भागात अजून एक कारखाना निर्माण झाला, चांदापुरी येथे चांदापुरी सहकारी साखर कारखाना म्हणून त्या कारखान्याला ओळखले जात होते अलीकडच्या काळात हा कारखाना ओंकार साखर कारखाना म्हणून ओळखला जात आहे. या कारखान्यामुळे तेथील बेरोजगार तरुणांना रोजगार, तर मिळालाच आर्थिक उन्नती होण्यास मदत झाली.
साखर कारखान्यामुळे माळशिरस तालुक्याची अशी प्रगती झाली
१) शेती व आर्थिक प्रगती
साखर कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळू लागला, त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले. ऊस लागवडीसाठी सुधारित तंत्रज्ञान, सिंचन आणि खतांचा वापर वाढला. सहकारी तत्त्वावर चालणारे कारखाने शेतकऱ्यांना भागधारक बनले, त्यामुळे त्यांना लाभांश मिळतो.
२) स्थानिक रोजगारनिर्मिती
साखर उत्पादन, वाहतूक, मशीन दुरुस्ती, पॅकिंग यासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला. हंगामी आणि कायमस्वरूपी नोकऱ्यांमुळे ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य निर्माण झाले.
३) उद्योगधंद्यांना चालना
साखर कारखान्याशी संलग्न अनेक उद्योग विकसित झाले, जसे की इथेनॉल उत्पादन, वीज निर्मिती, कागद उद्योग, साखर गोडे आणि मद्यनिर्मिती, कारखान्याच्या उपउत्पादनांमधून वीज निर्मिती करून ती गावांना पुरविता येऊ लागली.
४) सामाजिक व शैक्षणिक विकास
साखर कारखाने सहकारी तत्त्वावर असल्याने ग्रामीण भागात शिक्षणसंस्था, रुग्णालये आणि इतर सुविधा निर्माण झाल्या. शेतकरी प्रशिक्षण केंद्रे, कृषी संशोधन आणि नवे तंत्रज्ञान यामुळे शेती अधिक उत्पादक घेऊ लागले.
५) ग्रामीण पायाभूत सुविधा सुधारणा
रस्ते, पुल, सिंचन व्यवस्था, वीजपुरवठा यामध्ये सुधारणा झाली. गावांमध्ये बँका, सहकारी संस्था आणि पतपेढ्या स्थापन झाल्या, ज्यामुळे आर्थिक व्यवहार सुलभ होत गेले.
६) पर्यावरणपूरक विकास
आधुनिक साखर कारखाने बायोगॅस, इथेनॉल आणि बायोडिग्रेडेबल पदार्थ तयार करतात, ज्यामुळे प्रदूषण कमी होते. उसाच्या कांडीकडून जैवइंधन आणि वीज निर्मिती करता येते, ज्यामुळे हरित ऊर्जा वापर वाढला.
अधिक वाचा: बायोगॅसमधून बाहेर पडणाऱ्या स्लरीचं केलं सोनं, 'गोकुळ'चा अफलातून प्रयोग; वाचा सविस्तर