जांभूळ हे सर्वांचेच आवडीचे फळ. मित्रांच्या चर्चेतून एका विदेशी सफेद जांभूळ जातीची माहिती मिळाली. आपल्याकडे देखील हे जांभूळ असावे असे मनोमन वाटले आणि मित्रांच्याच मदतीने रोपे मागवून लागवड केली गेली, ती बुटक्या सफेद जांभळाची.
आपल्या अत्याधुनिक संकेत नर्सरीच्या माध्यमातून सतत नाविन्यपूर्ण प्रयोग करणार्या विक्रांत काले यांच्या श्रीरामपुर - शिर्डी नजदिक असलेल्या वाकडी ता. राहता जिल्हा अहिल्यानगर पूर्वीचे अहमदनगर येथील शेतात असलेल्या या सफेद जांभळाची ही यशकथा.
आंबा, पेरु, फणस, अशा विविध फळांतील नवीन जातींच्या ४० एकर बागेसोबत काले यांनी जांभूळाची एक एकर क्षेत्रात १२ बाय १५ फुटांवर लागवड केली आहे. जून २०१९ मध्ये लागवड झालेल्या या बागेतून लागवडी नंतर तिसर्याच वर्षी फळे सुरू झाली. सध्या काले यांची ही बाग चार वर्षांची असून फळांची संख्या देखील चांगली आहे.
चवीला काळ्या जांभळाच्या तुलनेत सफेद जांभूळ अधिक चांगले असल्याने खरेदीदार सफेद जांभूळ आवडीने घेतात. तसेच पारंपरिक काळे जांभूळ बाजारात येण्यापूर्वीच सफेद जांभूळ मिळत असल्याने या सफेद जांभळांना बाजारात मागणी अधिक आहे. ज्यामुळे शेतकर्यांना सफेद जांभूळ शेती भविष्याच्या दृष्टीने निश्चितच फायद्याची शेती म्हणून सफेद जांभूळ ठरू शकेल असेही विक्रांत काले सांगतात.
वादळी वारा आणि पावसाची, सफेद जांभळाला नाही भिती
पावसाळ्या पूर्वीच एप्रिल पासून या बुटक्या सफेद जातीच्या जांभूळ झाडांना फळे लागत असल्याने पावसाच्या वार्यात फळगळ होण्याची भिती या झाडांना नाही. तसेच जमिनीलगत बुटके झाड असल्याने फळांची तोड करणे देखील सहज शक्य होते.
बुटक्या सफेद जांभूळ बागेचे व्यवस्थापन
बुटक्या सफेद जांभूळ बागेच्या व्यवस्थापनेत नोव्हेंबर पासून ते डिसेंबर पर्यंत बागेला पाण्याचा ताण दिला जातो. त्यानंतर जानेवारी मध्ये खते तसेच सॅंड फिल्टर मधून स्वच्छ केलेले पाणी झाडांच्या खोडाजवळ दोन्ही बाजूने एक एक ठिबक नळी द्वारे दिले जाते. ज्यातून पुढे मार्च मध्ये उत्तम फूल धारणा होत त्यापासून अपेक्षित फळांचे उत्पादन लक्ष साधले जाते.
हेही वाचा - निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक : मात्र आता करतोय पेरु शेती !