दुग्धव्यवसाय हा शेतीपूरक असलेला सर्वांत महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांना अर्थार्जन करून देणारा व्यवसाय. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सर्वच क्षेत्रात हळूहळू प्रगती करत होता. स्वातंत्र्यानंतर भारताला कृषी क्षेत्रातील अनेक कमी जाणवल्या. पुढे शेतीचं उत्पादन वाढीसाठी संशोधने झाले. त्याच काळात भारतात आढळणाऱ्या गायी कमी दूध देत असल्याने संकरित गायींचा महाराष्ट्रात प्रवेश झाला.
पश्चिम महाराष्ट्रात सर्वांत पहिल्यांदा हे प्रयोग राबवले गेले पण मराठवाड्यात संकरित गाय येण्यासाठी बराच काळ गेला. पण मराठवाड्याला संकरित गायीची ओळख करून देण्याचा आणि खऱ्या अर्थाने मराठवाड्यातील पहिली संकरित गाय तयार करण्याचा मान मिळतो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिंपरी राजा येथील वामन पांडुरंग जोशी यांना...
वामन जोशी हे मूळ कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील बसणी या गावचे. निजामाच्या काळात त्यांचे वडील पांडुरंग जोशी हे जमीन मोजणीदार म्हणून काम करायचे. निजाम काळातील पिंपरी राजा जहागिरीमध्ये त्यांची नोकरी. नोकरीमुळे जोशी यांचे कुटुंब मराठवाड्यातील पिंपरी राजा येथे स्थायिक झाले. पुढे त्यांना याच जहागिरीमध्ये असलेल्या देवगाव येथे जमिनी घेतल्या आणि शेतीमध्ये नवनवे प्रयोग करायला सुरूवात केली.
शेती क्षेत्रात वामन जोशी हे सुरूवातीपासून खूप पुढारलेले. घरची जमीन आणि मुबलक पाणी असल्यामुळे त्यांनी पहिल्यापासूनच शेतात नवनवीन प्रयोग राबवले होते. १९६० साली त्यांनी देवणी, लाल कंधारी अशा देशी गायी पाळल्या. त्यातून वळूची उत्पत्ती केली आणि या वळूंना प्रदर्शनात उतरून बक्षिसे जिंकली. स्पर्धा आणि बक्षिसांमुळे जोशी यांची ख्याती सर्वदूर पसरली.
पुढे त्यांनी १९६५-७० या दरम्यान गीर आणि थारपारकर गायी विकत घेतल्या. त्यानंतर जोशी यांच्या दूध उत्पादन वाढीला सुरूवात झाली. १९६५च्या दरम्यान जेष्ठ चिरंजीव श्रीकृष्ण वामन जोशी, पुतणे पुरूषोत्तम चिंतामण जोशी, पुतणे आविनाश रामचंद्र जोशी यांची शेतीच्या उभारीच्या काळात मोलाची साथ होती.
समांतरपणे छत्रपती संभाजीनगर शहराच्या सीमा वाढत होत्या. औद्योगिकीकरणामुळे लोकसंख्या आणि तुलनेने दूधाची मागणी वाढत होती. शहरातून पिंपरी राजा गावात मुक्कामी एसटी बस असायची. त्यामुळे एसटीतून दुधाच्या किटल्या शहरात पाठवल्या जायच्या. त्यांचेच पुतणे प्रकाश रामचंद्र जोशी हे शहरात दूध विकण्याचे काम करत. यातून अर्थार्जन होत गेले आणि जोशी यांना दूधवाले जोशी असं बिरूद मिळालं.
दरम्यान, १९७०च्या आसपास कै. मणीभाई देसाई यांच्या पुण्यातील उरूळी कांचन येथील संस्थेतून त्यांनी संकरीत गोपैदास सुरू केली. जोशी आणि मणिभाई देसाई यांचे त्यावेळी चांगले संबंध असल्याने देसाई यांच्या संस्थेचे एआय (आर्टिफिशिअल इंसिमिनेशन) सेंटर पिंपरी राजा येथे आले. संकरीत गोपैदाशीसाठी दवाखानाही पिंपरी राजात आला. त्यातून गीर, देवणी, डांगी, थारपारकर यावर जर्सी आणि होल्स्टेनचे क्रॉस करण्यात आले.
पुढे १९७२ नंतर १०० संकरित गायी जोशी यांनी आपल्या गोठ्यात तयार केल्या. मराठवाड्यातील गावरान किंवा देशी गाय जास्तीत जास्त १० लीटर दूध द्यायची. पण होल्स्टेन आणि फ्रिजियनचे क्रॉस केल्यानंतर शेतकऱ्यांना ३० ते ४० लीटर दूध देणाऱ्या गाया पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या.
लोकांच्या बघण्यासाठी रांगा
जोशी यांचा सुसज्ज असा गोठा आणि संकरित गायी पाहण्यासाठी परराज्यांतूनही लोकं येत असत. आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांची तर रांगच लागलेली असायची. संकरित गाय ही मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नवलच होतं. त्यातच येथील शेतकऱ्यांनी ३५ ते ४० लीटर दूध देणाऱ्या गाया कधी पाहिल्या नव्हत्या त्यामुळे या गाया त्यावेळी लोकप्रिय झाल्या होत्या.
उत्तम व्यवस्थापन
इ.स. १९७० च्या दशकात जोशी यांनी सिमेंटचा गोठा, गायींसाठी गव्हाण, पंखा, पाण्याचा हौद, फवारे, ही व्यवस्था उभी केली. त्याचबरोबर चाऱ्यासाठी कुट्टी मशीन, खाद्याचे नियोजन असं उत्तम व्यवस्थापन केलं होतं. गोठ्यांतील गायींचे गोमूत्र साठवले जायचे, नंतर गोमूत्र टँकरद्वारे उसाच्या शेतात सोडलं जायचं. त्यांच्या या व्यवस्थानामुळेचं शेतीतील उत्पादनही चांगले होते असे. विक्री व्यवस्थापनासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात पुतणे प्रकाश रामचंद्र जोशी यांना ठेवले होते.
६०-७०च्या दशकात आधुनिक शेती
साधारण १९६५ सालाच्या आसपास त्यांनी मॅस्सी फर्ग्गुसन ट्रॅक्टरचे दोन सेट (ट्रॅक्टर, ट्रॉली, अवजारे) विकत घेतले होते. जोशी यांच्याकडे १९७५ साली मॅकेनिकल लागवड तंत्र होते. तर १९७७-७८ साली त्यांच्या गोठ्यामध्ये १०० म्हशी आणि १०० गायी होत्या. त्यांच्याकडे दुभत्या आणि गाभण जनावरांचा गोठा वेगवेगळा होता. त्या काळात त्यांच्याकडे गुऱ्हाळ होतं. ते गुऱ्हाळ तब्बल ८ महिने चालत असे.
मुलांना केलं जनावरांचे डॉक्टर
जोशी यांचे सुपुत्र श्याम जोशी हे त्याकाळी परभणी येथे कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. व्यवसायातील प्रगती बघता 'आपल्याकडे २०० जनावरे आहेत तर आपल्याच घरचा एक डॉक्टर असायला पाहिजे' या विचारातून त्यांना नागपूर येथे पशुवैद्यकीय शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. पुढे श्याम हे डॉक्टर झाल्यामुळे व्यवस्थापन सोपं झालं. त्याकाळी सुविधाही कमी असल्यामुळे घरातला डॉक्टर या व्यवसायासाठी फायद्याचा ठरला.
संकरित गोवंशाचा प्रसार
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग यांच्या माध्यमातून जोशी यांच्या गायी विविध ठिकाणी प्रदर्शनासाठी नेल्या जात होत्या. कारण शेतकऱ्यांना या संकरीत गायीची माहिती नव्हती. त्या माध्यमातून संकरित गोवंशाचा प्रचार आणि प्रसार झाला. त्यामुळेच पुढील काळात मराठवाड्यात दूधक्रांती झाली. कालांतराने पाऊसमान कमी झाले. बाकी पिकांचे बागायतीकरण झाले. त्यामुळे जोशी यांच्याकडीन दुग्धव्यवसाय हळूहळू कमी होत गेला आणि स्पोर्ट्स किंवा इतर व्यवसायाकडे हे कुटुंब वळाले.
पण वामन पांडुरंग जोशी यांच्या दूरदृष्टीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आधुनिकतेची चाहूल लागली होती. अजूनही अनेक गावांत ज्या सुविधा नव्हत्या त्या सुविधा जोशी यांच्याकडे १९६०च्या दशकात होत्या. त्यांच्यामुळेच मराठवाड्याला पहिली संकरीत गाय पाहायला मिळाली आणि दुग्धोत्पादन वाढण्यास मदत झाल्याचं आपण निर्विवादपणे म्हणू शकतो.
आजोबांच्या दूरदृष्टीमुळे त्याकाळीही आम्हाला आधुनिक शेती अनुभवायला मिळाली. आमच्या कुटुंबात शिक्षणाला मोठे महत्त्व दिले जात होते. दुधामुळे आमच्या कुटुंबातील आरोग्याच्या समस्या उद्भवल्या नाही. पुढे काही सदस्य खेळाकडे वळाले आणि अजूनही ते चांगली कामगिरी करत आहेत. आमच्या कुटुंबात आज तब्बल १० छत्रपती पुरस्कार आहेत.
- दीपक जोशी (वामन जोशी यांचे नातू आणि जेष्ठ प्रयोगशील शेतकरी, देवगाव, ता. पैठण)