Join us

आपल्या शैक्षणिक ज्ञानाच्या जोरावर फुलंब्रीच्या संतोषरावांनी आद्रक पिकातून घेतले विक्रमी उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 1:00 PM

Success Story Ginger Farming जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास, हे गुण अंगी असतील तर शेती व्यवसायातूनदेखील लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. याचा प्रत्यय पाच एकर क्षेत्रातून १० महिन्यांत अद्रकचे ७५ लाख रुपयांचे उत्पन्न घेतलेल्या संतोष यांच्याकडे बघून येतो.

रऊफ शेख

जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनत करण्याची तयारी, आत्मविश्वास, हे गुण अंगी असतील, तर शेती व्यवसायातूनदेखील लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. याचे मुख्य उदाहरण म्हणून फुलंब्रीमधील एका शेतकऱ्याचे नाव द्यावे लागेल. पाच एकर क्षेत्रातून १० महिन्यांत अद्रकचे ७५ लाख रुपयांचे उत्पन्न घेतल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे.

संतोष दत्तात्रय नागरे, असे या शेतकऱ्याचे नाव असून, तो पदवीधर आहे. संतोषला एक भाऊ असून, दोघांत २० एकर शेती आहे. त्याचे वडील पारंपरिक शेती करीत होते; परंतु यातून समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. यामुळे संतोष हे निराश असायचे.

उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांनी शेतीचा कारभार स्वतःकडे घेत नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा पपई, त्यानंतर ऊस, चकीची लागवड करून त्यामधून विक्रमी उत्पन्न मिळविले. यामुळे संतोष यांचा आत्मविश्वास वाढला.

यानंतर त्यांनी पाच एकर क्षेत्रात जून २०२३ मध्ये माहीम या जातीच्या अद्रकची लागवड केली. दहा महिन्यांच्या काळात त्यांनी या पिकासाठी रासायनिक - सेंद्रिय खत, फवारणी, मशागत, बेणे, पाणी यावर १२ लाख रुपये खर्च केले. यातून एप्रिल २०२४ महिन्याच्या शेवटपर्यंत त्यांना ७५० क्विंटल अद्रकचे उत्पादन मिळाले.

ज्यातून एकरी दीडशे क्विंटल उतारा आला. छत्रपती संभाजीनगर येथील बाजारपेठेत अद्रकला प्रतिक्विंटल १० हजार रुपये भाव मिळाला. यातील २५० क्विंटल अद्रक विक्री करून २५ लाख रुपये मिळविले.

५०० क्विंटल बेणे विकले

संतोष यांच्याकडे चांगल्या दर्जाची अद्रक असल्याची माहिती मिळाल्यानंतर सातारा येथील पाचशे शेतकऱ्यांनी नागरे यांच्याकडून ५०० क्चिटल अद्रकचे बियाणे खरेदी केले. यातून संतोष यांना ५० लाख रुपये मिळाले.

जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनत करण्याची तयारी, आत्मविश्वास, हे गुण  अंगी असतील, तर शेतीतूनदेखील लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. हे मी सत्यात उतरवून दाखविले आहे. यामुळे नोकरीच्या मागे न लागता तरुणांनी आधुनिक शेती करावी. - संतोष नागरे, शेतकरी, फुलंब्री.

हेही वाचा - पिंपरखेडच्या शिक्षित तरुणाने फूलशेतीतून शोधला रोजगार; पॉलीहाऊसमधील जरबेरा देतोय आर्थिक साथ

टॅग्स :शेतीशेतकरीपीक व्यवस्थापनफुलंब्रीऔरंगाबादमराठवाडाशेती क्षेत्रबाजार