Women Farmer Success Story : नदीला कितीही मोठा पूर आला आणि पुरात सगळं वाहून गेलं तरी पूर ओसरल्यानंतर ज्याप्रमाणे 'लव्हाळा' पुन्हा उभा राहतो त्याप्रमाणेच काही जणांचा संघर्ष असतो. नाशिक येथील उच्चशिक्षित असलेल्या संगिता पिंगळे यांचाही प्रवास असाच काहीसा संघर्षमय राहिला आहे. खऱ्या अर्थाने मागच्या सात ते आठ वर्षामध्ये शेतीमध्ये त्यांनी केवळ नावच कमावलं नाही तर शेती करणाऱ्यांसमोर वेगळा आदर्श निर्माण केलाय.
नाशिक जिल्ह्यातील मातोरी येथील संगीता यांचे २००० साली अनिल पिंगळे यांच्याशी लग्न झाले. अनिल यांचे वडिलोपार्जित शेतीचे क्षेत्र जास्त असल्यामुळे संगिता यांना शेतीत काम करावे लागले नाही. संगीता यांनी रसायनशास्त्रात पदवी घेत स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करायला सुरूवात केली होती. पण लग्नामुळे स्पर्धा परीक्षा अर्ध्यातच सुटली आणि त्यांना संसाराकडे लक्ष द्यावे लागले. संगीता यांना २००१ साली पहिले कन्यारत्न प्राप्त झाले. पुढे २००४ साली दुसरे पुत्ररत्न प्राप्त झाले पण बाळ जन्मजात अपंग जन्माला आल्यामुळे पाच वर्षे सांभाळ करूनही निधन पावले.
पुढे २००७ साली गरोदर असताना त्यांच्या पतीचे निधन झाले. यावेळी त्या ९ महिन्यांच्या गरोदर होत्या. त्यांना मुलगा झाला आणि पतीच्या निधनानंतर जबाबदारी वाढली. पुढची काही वर्षे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना आधार दिला. २०१६ साली कुटुंब विभक्त झाले आणि संगीता यांना आपल्या वाट्याला आलेली १३ एकर शेती स्वतः सांभाळाली सुरुवात केली. लहानपणापासून शेतीमध्ये काम न केलेल्या संगीता यांना आता पूर्णवेळ शेतीमध्ये काम करावं लागणार होतं.
पुढे २०१७ पासून त्यांनी पूर्णवेळ शेतीमध्ये काम करायला सुरूवात केली. सुरूवातीला खूप अडचणी आल्या पण त्यांनी खचून न जाता शेती करून दाखवली. वाट्याला आलेल्या १३ एकर क्षेत्रातील १० एकर द्राक्ष आणि ३ एकर टोमॅटो शेती त्या पहिल्यापासून करतात. टोमॅटोचे पीक निघाल्यानंतर त्या वेगवेगळे पीके त्यामध्ये घेतात. विशेष म्हणजे आपल्या शेतातील द्राक्षाची निर्यातही त्या करतात. सह्याद्री, सुला या मोठमोठ्या कंपन्यांशी त्या जोडलेल्या आहेत. निर्यातीबरोबरच लोकल बाजारातही त्या द्राक्षाची विक्री करतात.
नव्या वाणांना प्राधान्यद्राक्षाचे जुने थॉमसन आणि जम्बो हे वाण बदलून संगीता यांनी नवे वाण लागवड करायला सुरूवात केली. यामध्ये रेडग्लोब, अनुष्का, सुधाकर, एसएसएन, वाईन, आरा-३६ हे सहा वाण लावले आहेत. सुधाकर या वाणाचा माल एक्सपोर्ट केला जातो, वाईनचा माल सुला वाईनला दिला जातो तर बाकीचा माल इतर बाजारपेठेत विक्री केला जातो.
शेतीची सुरूवात करताना त्यांना अनेकांनी हिणवले. 'महिला शेती करू शकत नाहीत' असं कित्येकजण बोलले पण त्यांनी लोकांचे हे बोलणे आपल्या कर्तृत्वातून खोडून काढले. आपल्या शेतीमधून त्या आता वर्षाकाठी लाखो रूपयांची कमाई करत आहेत. खऱ्या अर्थाने आपल्या कार्यातून त्यांनी केवळ नावलौकिकच मिळवला नाही तर महिला शेतकऱ्यांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे.