Join us

Women Farmer : सलाम! अर्ध्या एकरात कर्टुले लागवड, गांडूळ खत निर्मितीतून महिला शेतकऱ्याची आर्थिक प्रगती!

By दत्ता लवांडे | Published: September 15, 2024 8:38 PM

रासायनिक शेती करताना त्यांना त्रास व्हायचा, खते-औषधांचा दुर्गंध यायचा म्हणून त्यांनी विषमुक्त, नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला. कोरोनानंतर त्यांनी आपली शेती पूर्णपणे विषमुक्त करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आणि गांडूळ खत, देशी गायीचे शेण, जिवामृत वापरायला सुरूवात केली. 

Women Farmer Success Story : नदीला कितीही मोठा पूर आला तरी पूर ओसरल्यानंतर ताठ मानेने ज्याप्रमाणे लव्हाळ उभा राहतो त्याप्रमाणे शेती करताना कितीही संकटे आले तरी जिद्द न हारणारा शेतकरी असतो. सुलतानी आणि आसमानी संकटाच्या आव्हानांशी तो पिढ्यान् पिढ्या दोन हात करत आला आहे. अशीच काहीशी कहाणी पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील सुनंदा चासकर या महिला शेतकऱ्याची आहे. कोरोना काळात पतीच्या निधनानंतर त्यांनी केलेला संघर्ष प्रेरणादायी आहे. केवळ अर्ध्या एकरामध्ये कर्टुले या रानभाजीची लागवड करून त्यांनी आर्थिक समृद्धी साधली आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर हा पट्टा शेतीमध्ये सधन भाग. याच भागातील लांडेवाडी येथील सुनंदा चासकर या प्रयोगशील महिलाशेतकरी. रासायनिक शेती करताना त्यांना त्रास व्हायचा, खते-औषधांचा दुर्गंध यायचा म्हणून त्यांनी विषमुक्त, नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला. कोरोनानंतर त्यांनी आपली शेती पूर्णपणे विषमुक्त करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आणि गांडूळ खत, देशी गायीचे शेण, जिवामृत वापरायला सुरूवात केली. 

साधारण २०२३ मध्ये त्यांनी १० गुंठ्यावर कर्टुले या रानभाजीची लागवड केली. या शेतीला पूर्णपणे सेंद्रीय खते आणि औषधे वापरल्यामुळे त्यांना यातून चांगले पैसे मिळाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा १० गुंठे क्षेत्र वाढवले आणि सध्या त्यांच्याकडे २० ते २५ गुंठे क्षेत्रावर कर्टुल्याची लागवड आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागवड केलेल्या कर्टुल्यातून त्यांना ५० हजारांचा नफा झाल्याचं ते सांगतात.

व्यवस्थापनकर्टुल्यासाठी गांडूळ खत, शेणखत, जिवामृत, गोकृपाअमृत आणि घरी बनवलेले खते ते शेतीसाठी वापरतात. कर्टुल्याची लागवड केल्यानंतर एक महिन्यात वेल यायला सुरूवात होते. त्यानंतर काही दिवसांत नर आणि मादी वेल ओळखता येते, नर वेलीचे प्रमाण जास्त असेल तर वेल काढून घेतली जाते. चार मादी वेलीसाठी आणि एक नर वेल अशा प्रमाणात ठेवावे लागते.

एकदाच लागवडकर्टुल्याची एकदा लागवड केली की, पुन्हा लागवड करण्याची गरज नसते. जमिनीमध्ये या वेलीचे कंद तयार होतात. पुढील पावसाळ्यामध्ये या कंदातून पुन्हा वेल फुटते आणि त्यातून उत्पादन घेता येते. त्यामुळे कर्टुल्याचा पुन्हा लागवड करण्याचा खर्च वाचतो. 

फवारणी करताना सुनंदाताई

विक्री आणि उत्पन्नसेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या कर्टुल्याला चांगली मागणी असून त्याची विक्री सुपर मार्केट आणि मॉलमध्ये केली जाते. होलसेल दरामध्ये विक्री होत असल्याने प्रतिकिलो २०० रूपयांचा दर मिळतो. अर्धा एकरमधून त्यांना प्रती आठवडा ४० किलो कर्टुल्याचे उत्पादन होते. एका महिन्याला साधारण १६० किलो कर्टुल्याचे उत्पादन होत असून २०० रूपये किलोप्रमाणे ३० ते ३२ हजार रूपयांचे उत्पन्न एका महिन्यात होते. खते, औषधे घरीच तयार करत असल्यामुळे त्यांना उत्पादन खर्च खूप कमी येतो. त्यामुळे चांगला नफा कर्टुल्यातून मिळतो.

गांडूळ खत आणि इतर वस्तूसुनंदा या केवळ शेतीच नाही तर गांडूळ खताचे उत्पादनही करतात. यातूनही त्यांना चांगला आर्थिक फायदा होतो. त्यांनी कृषी विज्ञान केंद्रातून विविध व्यवसायांचे प्रशिक्षण घेतले असून देशी गायीच्या शेणापासून धूपकांडी, गौऱ्या, दंतमंजन, चेहऱ्याला लावण्यासाठीची क्रीम, घरगुती जात्यावरील डाळी, सुकवलेले पदार्थ तयार करतात. या मालाची आणि पदार्थांची प्रदर्शनात विक्री होते. 

मुलीची साथसुनंदा यांना शेतीच्या कामात आणि शेतमालाच्या विक्री कामात मुलगी तनुजा हिचा चांगला आधार मिळतो. कर्टुल्याच्या तोडणीपासून, फवारणी, खते देणे, पाणी देणे, कर्टुले निवडणे आणि मॉलला विक्रीसाठी नेण्याच्या सर्व कामात तनुजा आईला मदत करते. तनुजाच्या मदतीमुळे त्यांना खूप मोठा आधार झाला, तिच्यामुळेच मी आज इथपर्यंत आले असल्याचं त्या सांगतात.

शेतीच्या कामात मुलगी तनुजाची मदत

महिलांसाठी प्रेरणासंगिता यांचा संघर्ष महिला शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. केवळ प्रयोगशीलच नाही तर त्यांनी घरी बनवलेल्या विविध वस्तूंची विक्री कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या प्रदर्शनात केली. यातूनही त्यांनी चांगले अर्थार्जन केले आहे. तर त्यांचा प्रवास आणि त्यांनी केलेले प्रयोग आज इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहेत. त्यांच्या कार्याला लोकमत अॅग्रोकडून सलाम...!

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीमहिलापुणे