Women farmer story : संजय खासबागे / वरूड : 'आईच्या कुशीत असते प्रेमाची अफाट सावली, जन्म दिला तिने मला कष्टातून मी भरून धन्य पावली' खरंच प्रत्येक मुलगी आईचा असाच गोडवा गाते. आई- वडिलांच्या छत्रछायेखाली लहानाचे मोठे होऊन कर्तृत्त्वाचे बळ मिळते.
मात्र, आई वडील अचानक निघून गेले, तर मुलांची आबाळ होते. पुसला येथील बिडकर परिवारातील पाच बहिणींच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरवले आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, पाचपैकी तीन बहिणी विवाहीत झाल्या. घरात अठराविश्वे दारिद्र, नात्यागोत्यातील लोकांनीही साथ सोडली.
मात्र, दोन बहिणी सुशिला आणि देवी बिडकर यांनी संघर्षातून इतिहास रचला. वडिलांची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि जिवाची पर्वा न करता घनदाट महेंद्री पंढरी जंगलात असलेली शेती संघर्षातून फुलविणाऱ्या रणरागिणी कृषिकन्या बिडकर भगिनींचा संघर्षमय प्रवास सुरू आहे.
बिडकर भगिनींचा जन्म वरुड तालुक्यातील पुसला या गावात झाला. पाच बहिणी, घरात भाऊ नाही आणि वडील व्यसनी असल्याने आईचे जीवन अतिशय त्रासात गेले. प्रकृती अत्यंत नाजूक झाल्याने त्यांनी मृत्यूला कवटाळले आणि मग उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने शिक्षण घेण्याच्या वयात त्यांनी पडिक शेती कसणे सुरू केले.
पुसला गावापासून शेत नऊ-दहा किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या कुशीत पंढरी जंगलात आहे. शेतात नियमित पायी येणे-जाणे करतात. दिवसा कधी कधी वीज साथ देत नाही, म्हणून ओलितासाठी रात्री अपरात्री जाऊन ओलित करणे, हे नित्याचे काम झाले. हे करताना त्यांना हिंस्र पशुंचा सामना करावा लागतो.
जनावरांसोबत मुलगी असल्याने समाजातील वाईट प्रवृत्तींचा सामना करून शेतात संत्रासह रब्बी पिके घेण्यास सुरुवात केली व संघर्षातून शेती पिकवून त्या कृषिकन्या झाल्या, तेव्हा त्यांना कुणाचाही आधार मिळाला नाही.
मानसिक त्रास, दहशतीखाली जीवन जगत मोठ्या हिमतीने त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडल्या. कोणत्याही संकटाला न डगमगता स्वतः चे अश्रू स्वत: च पुसून हिमतीने उभे राहून त्यांनी शेतीची कामे चालूच ठेवली.
आभाळाला वडील समजून आणि धरतीला आई समजून रात्रंदिवस शेतीत राबून त्या उत्पादन घेतात. त्यांच्या श्रमाच्या वेलींना यशाची फुले बहरली. यशाच्या पायऱ्या गाठताना प्रचंड संघर्ष त्यांच्या वाट्याला आला. त्यातूनही वाट काढल्याने कृषिकन्या म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक झाले.