मेहरून नाकाडे
रत्नागिरी : कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी सखाराम गोताड वडापाव विक्रीचा व्यवसाय करतात. पतीच्या कष्टाला हातभार लावावा, यासाठी सुनीता यांनी घरच्या शेतीकडे लक्ष केंद्रित केले. त्या भात, नाचणी, काजू, आंबा उत्पादन घेत असून, बचत गटाच्या मदतीने गांडूळखत निर्मिती करून त्याची विक्री करत आहेत.
पती सखाराम यांना वडापाव व्यवसायामुळे शेतीकडे लक्ष देणे शक्य होत नव्हते. मात्र सुनीता यांनी ही जबाबदारी उचलली. खरीप हंगामात त्या भात व नाचणी ही पिके घेतात. शिवाय वेलवर्गीय भाज्यांचीही लागवड करतात.
आंबा, काजू लागवड त्यांनी केली असून, आंब्याची खासगी विक्री करतात. सहाशे काजू झाडांची लागवड केली असून, उत्पादित ओला काजूगर काढून त्याची विक्री करतात. शिवाय वाळलेल्या काजू बीची चांगला दर पाहून थेट विक्री करतात.
गावातील महिलांना एकत्रित करून सुनीता यांना बचतगट तयार केला आहे. प्रत्येकीच्या घरातील, शेतीची कामे उरकल्यावर या महिला एकत्र येतात. सध्या अनेकांचा सेंद्रिया शेतीकडे विशेष कल असल्यामुळे बचत गटातर्फे गांडूळखत युनिट तयार केले.
ओला कचरा एकत्र करून त्यापासून गांडूळखत तयार करतात. गांडूळखताला दरही चांगला मिळतो व विक्री हातोहात होत असल्याचे सुनीता यांनी सांगितले. बचत गटाला उत्पन्नाचा मार्ग सापडला असून, महिलांच्या कष्टाला यश आले आहे सुनीता यांचे शेतीतील योगदान व बचता गटातील कार्याचा सन्मान म्हणून कृषी विभागातर्फे त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आंब्याची खासगी विक्री
गोताड कुटुंबाने आंबा लागवड केली आहे. खत व्यवस्थापनापासून फवारणी ते आंबा काढणीपर्यंत स्वतः सुनीता व त्यांचे कुटुंब परिश्रम घेत आहे. आंबा बाजारात विक्रीला न पाठवता त्याची खासगी विक्री करतात. आंब्याचा दर्जा चांगला असल्याने दरही उत्तम मिळतो. पालापाचोळा, जनावरांचे शेण एकत्र करून कंपोस्ट खत तयार करून कलमांना वापरत आहेत. त्यामुळे उत्पन्न तर चांगले मिळतेच, फळांचा दर्जाही उत्तम आहे.
नाचणी लागवड
भात, नाचणीची लागवड मर्यादित आहे. मात्र संपूर्ण वर्षभर हे धान्य गोताड कुटुंबाला पुरते. जमीन पडिक ठेवायची नाही, यासाठी सुनीता मेहनत करतात. त्यांनी काजू लागवड केली आहे. ओल्या काजूगराला दर चांगला मिळतो व मागणीही अधिक आहे. वाळलेली काजू बी गोळा करून चांगला दर पाहून विक्री करतात. काजू झाडांनाही दरवर्षी खत, माती घालणे व आवश्यकता वाटल्यास फवारणीसुद्धा करतात.
कुटुंबांसाठी माझे पती वडापावची गाडी चालवतात. साहजिकच घराची जबाबदारी माझ्यावर आली. शेतीकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते, यामुळेच मी स्वतः घर व शेतीची जबाबदारी घेतली. वाडीतील महिलांनी एकत्रित येत बचतगट तयार केला आहे. या बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्नाचा मार्ग आम्हीच शोधला व गांडूळखत युनिट उभारले. गांडूळखत तयार करत असून, विक्रीही करतो. गांडूळखताला मागणी चांगली असल्यामुळे दरही चांगलाच मिळतो. आमच्या प्रयत्नाला यश आले असून, खतनिर्मिती युनिटचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला कृषी विभागाचे सातत्याने मार्गदर्शन मिळते. - सुनीता सखाराम गोताड, करबुडे