Join us

Women Success Story शेतकऱ्यांसाठी झटणारी भारतातली पहिली महिला ड्रोन पायलटची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 10:22 AM

ही कहाणी आहे हरयाणातल्या करनाल येथील ३० वर्षीय निशा सोलंकी हिची. ग्रामीण भागातील शेतकरी अनेकदा संकटांना तोंड देत असतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन तिने पारंपरिक शिक्षणाची वाट सोडून कृषी अभ्यासक्रम निवडला.

पिकांवर फवारणी करण्याचा सुरक्षित, कमी खर्चीक, वेळ वाचवणारा मार्ग कोणता? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे. हरयाणातल्या कृषी अभ्यासक मुलीने तिच्या अभ्यासातून, प्रयोगातून आणि समाजाप्रति असणाऱ्या तळमळीतून या प्रश्नाचं सोपं उत्तर शोधून काढलं आहे.

जमिनीवर घट्ट पाय रोवून आकाशात भरारी घेत तिने हरयाणातल्या शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे. आपल्याला गवसलेला फायदेशीर मार्ग हजारो शेतकऱ्यांना समजावून सांगत त्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे. म्हणूनच शेतकऱ्यांसाठी झटणारी भारतातली पहिली महिला ड्रोन पायलट म्हणून तिचे कौतुक होत आहे.

ही कहाणी आहे हरयाणातल्या करनाल येथील ३० वर्षीय निशा सोलंकी हिची. ग्रामीण भागातील शेतकरी अनेकदा संकटांना तोंड देत असतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन तिने पारंपरिक शिक्षणाची वाट सोडून कृषी अभ्यासक्रम निवडला.

तो करत असतानाच तिचे पाश्चात्त्य देशात ड्रोनचा विविध क्षेत्रांत विशेषतः शेतीक्षेत्रात होणारा वापर, त्याचे फायदे या गोष्टींकडे लक्ष वेधले गेले. कृषी अभ्यासक्रम पूर्ण होताच तिने या विषयाचा सखोल अभ्यास करण्यास सुरुवात केली. आधी तिने व्यावसायिक पायलट ड्रोन पायलटचे प्रशिक्षण पूर्ण केले. ड्रोन कसे चालवायचे कसे हाताळायचे या सगळ्या गोष्टी तिने शिकून घेतल्या.

हरयाणामध्ये सध्या ती महाराणा प्रताप कृषी महाविद्यालयात या विषयावर काम करते आहे. १५ किलोचं ड्रोन, फवारणीचं साहित्य घेऊन निशा शेतात उतरते. जिथे एरवी शेतकऱ्यांना एक एकर शेतात फवारणी करण्यासाठी ओषधासोबत १५० लिटर पाणी लागतं तिथे निशा हेच काम कमी वेळेत १० लिटरमध्ये यशस्वीरीत्या करून दाखविते.

ती म्हणते, सुरुवातीला शेतकऱ्यांना हे काही खरं वाटायचं नाही. मलाही त्यामुळे शंका वाटायची, पण जसजसे काम करत गेलो तसतसे परिणाम सर्वांसमोर येत गेले. शेतकऱ्यांना सोबत घेऊन मी काम करू लागले. त्यामुळे त्यांना स्वतःच खात्री होत होती. हळूहळू इतर शेतकऱ्यांमध्ये ही गोष्ट पसरू लागली. तेही मग ड्रोनचे प्रात्यक्षिक पाहायची इच्छा व्यक्त करू लागले. लोकांच्या प्रतिसादानंतर अल्पावधीतच हरयाणाला त्यांची पहिली सर्टिफाइड महिला ड्रोन पायलट मिळाली.

खरं तर निशाला लहानपणापासून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायची इच्छा होती. ड्रोन पायलटच्या माध्यमातून तिची इच्छा पूर्ण झाली. निशाने कृषी विषय घेऊन एमटेकपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. शेतीतील मशिनरी आणि ऊर्जा अभियांत्रिकी हा तिचा अभ्यासाचा विषय होता.

२०१९ साली हॉर्टिकल्चर विभागात काम करत असताना एका ड्रोन बेस कंपनीच्या कामावर देखरेख ठेवण्याचं काम तिच्यावर सोपविण्यात आलं. 'आयुष्यात पहिल्यांदाच ती ड्रोन पाहत होती, पण जिज्ञासेने ती सर्टिफाइड ड्रोन पायलट बनली. नागरी उड्डाण संचालनालयातून तिने प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र प्राप्त केलं.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर निशाकडे भारतीय संशोधन संस्थेतर्फे शेतकऱ्यांना मोफत ड्रोन शेतीचे प्रात्यक्षिक देण्याची जबाबदारी आली. तिच्या टीमवर २५० एकर शेतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. टीमने ६०० एकर क्षेत्रावर काम करून दाखविले, आजपर्यंत निशाने हजाराच्या आसपास शेतकऱ्यांना ड्रोनचे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे, त्याच्या फायद्याची माहिती दिली आहे. शेतीतील कामांचे कष्ट कमी व्हावेत, कमी वेळेत अधिकाधिक कामे पूर्ण व्हावीत, राबराब राबणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या हातात दोन जास्तीचे पैसे पडावेत या उद्देशाने दिवसरात्र खूप मेहनत करून तिने अहवाल तयार केला. अभ्यास केला. त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत.

निशा म्हणते, ड्रोन तंत्रज्ञान शेतीशी जोडणे ही खूप फायद्याची गोष्ट आहे. ड्रोनची मदत घेतल्याने शेतकऱ्यांचे अनेक तासांचे काम मिनिटांत होत आहे. पुरुषप्रधान समजले जाणारे शेतीचे काम महिला आणि युवकांनी शिकावे, त्यात ड्रोनसारख्या आधुनिक सोयीसुविधांचा वापर करावा यावर ती भर देते. ड्रोनने औषध फवारणी करताना आरोग्याच्या समस्या कमी होतात. कारण हाताने किंवा ट्रॅक्टरवरून औषध फवारणी करताना ते औषध त्या व्यक्तीच्या अंगावर, श्वासावाटे शरीरात जाण्याचा धोका असतो.

महिलांची गगनभरारी !निशाचे काम पाहून आता इतर महिलाही ड्रोन पायलट होण्यासाठी सरसावल्या आहेत. हरयाणा सरकारने करनालमध्ये ड्रोन उड्डाण आणि निगराणी केंद्र सुरू केलं असून, त्याअंतर्गत दहा जिल्ह्यांतल्या महिलांसाठी ड्रोन उड्डाण आणि डेटा अॅनालिसिसचं प्रशिक्षण सुरू केलं आहे. महिलांना या क्षेत्रात निर्भर करण्याचं शासनाचं ध्येय आहे. महिलांना ड्रोन पायलट बनविणारं हरयाणा आता भारतातलं पाहिलं राज्य बनलं आहे.

अधिक वाचा: Farmer Success Story भरघोस उत्पन्नासाठी या शेतकऱ्याने विकसित केली काजूची नवीन जात

टॅग्स :शेतकरीशेतीमहिलाआर्टिफिशिअल इंटेलिजन्सकीड व रोग नियंत्रणपीकहरयाणा