कौटुंबिक आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुरू केलेल्या लघु उद्योगाला आज चांगल्या अर्थसंपन्न ब्रँडमध्ये रूपांतरित करून बारमाही उद्योग संगीता ताईंनी उभारला आहे. या प्रक्रिया उद्योगांतर्गत आज आवळा, ऊस, जांभूळ आदींवर प्रक्रिया केली जाते.
अहिल्यानगर जिल्ह्यातील खडांबे (ता. राहुरी) येथील काशिनाथ तोंडे यांच्याकडे केवळ राहण्यापुरती जागा होती. पर्यायाने कुटुंब चालवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठात कंत्राटी मजूर काम करत असतांना विद्यापीठात फळ प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण होणार असल्याची माहिती मिळाली. ज्यात काशीनाथ यांनी पत्नी संगीता यांचा सहभाग नोंदविला. आठवीपर्यंत शिकलेल्या संगीता ताईंनी २००७ मध्ये विद्यापीठात फळ प्रक्रिया उद्योगाचे एक महिन्याचे प्रशिक्षण घेतले. नंतर परिसरातील अभ्यास करून घरगुती आवळा प्रक्रिया उद्योग २००८ मध्ये संगीता यांनी बचत गटाची मदत घेत उभा केला.
येणाऱ्या अडथळ्यांवर मात करत, परिस्थितीनुसार चव, आकर्षक पॅकिंग, दरोदार विक्री आदींचा खडतर प्रवास करत आता त्यांनी या गृह उद्योगाला एका चांगल्या अर्थसंपन्न प्रक्रिया उद्योगाच्या ब्रँडमध्ये रूपांतरित केले आहे. तसेच याच प्रक्रिया उद्योगाच्या जोरावर त्यांनी गेल्या सहा वर्षांपूर्वी एक एकर शेती घेतलेल्या धामोरी (ता. राहुरी) शिवारात तोंडे कुटुंब आज स्थायिक झाले आहे.
सध्या या प्रक्रिया उद्योगाच्या जोरावर घेतलेल्या एक एकर क्षेत्रात घर, प्रक्रिया उद्योगासाठी असलेले २५ बाय ६० अंतराचे शेड, तसेच विविध प्रक्रिया उत्पादने सुकविण्यासाठी टनेल ड्रायर आहे. तर उर्वरित क्षेत्रात १५ बाय १५ अंतरावरील आवळा बाग आहे. कुटुंबाच्या सहकार्याने उभा राहिलेला तोंडे परिवाराचा 'श्रावणी अॅग्रो फूड प्रोसेसिंग' हा उद्योग आज परिसरातील चार महिलांना वार्षिक रोजगार देत आहे, हेही विशेष आहे.
या उत्पादनांची आहे रेलचेल
आवळ्यापासून ज्यूस, कॅण्डी, पावडर, मोरवळा, लोणचं तर उसापासून गूळ पावडर, गुळवडी, काकवी, गूळ आलेपाक, यासोबतच बडीशेप, अद्रक, तुपापासून बनविलेली विशेष गुळवडी तयार होते. तसेच जांभळापासून ज्यूस व पावडर अशी विविध उत्पादने बारमाही तयार केली जातात.
यंत्रे खरेदी करत उद्योगाचा विस्तार
आर्थिक परिस्थितीमुळे उद्योग विस्तार करण्यासाठी विविध यंत्रांची खरेदी करणे शक्य नव्हते. तेव्हा २०१८ मध्ये कृषी विभागाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून आवळा, जांभूळ या फळांवर प्रक्रिया करण्यासाठी विविध यंत्रांची खरेदी करण्यात आली. ज्यामुळे आज आवळ्यासाठी क्रशर, बास्केट प्रेस, सीलिंग मशिन, पॅकिंग यंत्र, आवळा कॅण्डी बनविण्याचे टँक, जांभळासाठी गर काढणी, पावडर करण्यासाठी ग्राइंडिंग, ज्यूस काढणी, उसासाठी रस काढणी अशी १८ लाखांपेक्षा अधिक किमतीची यंत्रे आहेत.
.. अशी होते विक्री
बचत गटांचे प्रदर्शन, कृषी महोत्सव यांसह विविध किराणा मार्ट आणि ऑनलाइन विक्रीमार्फत उत्पादनांची विक्री केली जाते. ज्यातून सध्या ११ ते १२ लाखांच्या आसपास उलाढाल होत असून साधारण ३०-३५% नफा शिल्लक राहत असल्याचे संगीता ताई सांगतात.