Join us

Womens Day : १७व्या वर्षी लग्न, ३ महिन्याचं बाळ अन् पतीचं निधन! पण 'त्या' खचल्या नाहीत; द्राक्षशेतीतून बदललं कुटुंबाचं रूपडं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 11:04 AM

विधात्याच्याही मनाला गहिवर फुटेल एवढे संकटं वर्षा यांच्यासमोर उभे ठाकलेले असताना त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. 

- दत्ता लवांडे

नाशिक : वयाच्या सतराव्या वर्षी लग्न. लग्नानंतर बाळाला जन्म दिला पण बाळ तीन महिन्याचे असतानाच पतीचे निधन झाले. घरी १० एकर द्राक्षशेती. शिक्षण केवळ नववीपर्यंत झालेलं. पतीच्या निधनानंतर वयाच्या २१ व्या वर्षी कुटुंबाची सगळी जबाबदारी पडलेली. या सगळ्या संकटांशी दोन हात करत सगळी शेती सांभाळली आणि यशस्वीही करून दाखवली. वेळप्रसंगी ट्रॅक्टर चालवला पण खचून न जाता द्राक्षशेतीमध्ये त्या आज जवळपास ५० लाखांचा निव्वळ नफा कमावतायेत. ही कथा आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील वर्षा बोरस्ते यांची. विधात्याच्याही मनाला गहिवर फुटेल एवढे संकटं वर्षा यांच्यासमोर उभे ठाकलेले असताना त्यांचा हा संघर्षमय प्रवास थक्क करणारा आहे. 

वयाच्या सतराव्या वर्षी वर्षा यांचा नाशिक जिल्ह्यातील साकोरे येथील सुरेश बोरस्ते यांच्यासोबत विवाह झाला. त्यांच्या या सुखी संसारात अजून गोडवा आला आणि पुढे १९९४ साली त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. कुटुंबाचा आनंद द्विगुणीत झाला होता पण तेवढ्यात या कुटुंबावर नियतीने घाला घातला आणि बाळाच्या जन्मानंतर तीनच महिन्यात सुरेश यांचे अपघाती निधन झाले. वर्षा यांच्यावर संकटाचा डोंगर कोसळला. घरी फक्त तीन महिन्याचं बाळ आणि सासू एवढेच तीन जण. भविष्य अंधारमय झालं होतं. आत्महत्या करण्याचा विचार डोक्यात आला पण तो क्षणार्धात भिरकावून दिला. कारण नियतीने कितीही सत्वपरिक्षा पाहिली तरी हार मानणार त्या वर्षा कसल्या. कुटुंबाच्या अन् तीन महिन्याच्या लेकराची जबाबदारी अंगावर घेत त्यांनी घरची शेती जिद्दीने फुलवण्याचा संकल्प केला आणि सुरू झाला त्यांचा संघर्षमय प्रवास. 

साल होतं १९९४. काहीही झालं तरी आपण शेती करायचीच ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली. शिक्षण केवळ नववी झालं असल्यामुळे पुढे त्यांना अनेक अडचणी आल्या. व्यवहार कसा करायचा माहिती नाही. बाजारपेठ माहिती नाही. व्यापारी माहिती नाही ना मालाच्या विक्रीची माहिती... अशा अनेक अडचणी आल्या तरीही त्या भिडल्या अन् नडल्यासुद्धा... 

साधारण २००३ साली त्यांचे कुटुंब विभक्त झाले अन् त्यांच्याकडे १० एकर शेती वाटून आली. या जमिनीतील द्राक्षाची बाग मोडून त्यांनी पुढील काही वर्षात नवीन बाग लावायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी कर्ज काढलं आणि जुनी बाग मोडून नव्या वाणाच्या द्राक्षाची लागवड केली. पुढे यातून त्यांना चांगल्या प्रकारे अर्थार्जन होऊ लागलं. कोणत्याही पुरूषाचा पाठिंबा नसताना शेतीमध्ये एवढा धोका पत्करण्याचं वर्षा यांचं धाडस वाखाणण्याजोगं आहे.

त्यांचा प्रवास एकटीचा होता पण स्वप्न मात्र जिंकण्याचे होते. लोकल द्राक्षविक्री सोडून त्यांनी आपला माल निर्यातक्षम बनवण्याचा निर्णय घेतला आणि निर्यातक्षम द्राक्ष पिकवण्यास सुरूवात केली.  सुरूवातीला त्यांच्याकडून या पिकाचे व्यवस्थापन होणार नाही असा लोकांचा सूर होता. पण त्यांच्या कामातील सातत्य आणि जिद्द पाहून भल्याभल्यांचेही डोळे विस्फारले. कारण निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करून यशस्वीपणे निर्यात करण्याचा 'पण' त्यांनी पूर्ण केला होता. 

हे सर्व करत असताना एकुलत्या एक मुलाच्या शिक्षणाची गैरसोय होणार नाही याकडे त्यांचे लक्ष होते. त्यांनी मुलाला प्रवरानगर येथे कृषीच्या शिक्षणासाठी पाठवले होते. पुढे कुठेतरी स्थिरसावर होण्याची चिन्हे दिसताच नियतीची वक्रदृष्टी पडली अन् २०१४ साली कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या वर्षा यांच्या सासूबाईंचे निधन झाले. हा वर्षा यांना सर्वांत मोठा धक्का होता. या संकटावरही त्यांनी यशस्वीपणे मात केली. या घटनेनंतर त्यांनी आपल्या मुलाला घरी आणले. त्यानंतर प्रितम (मुलगा) शेतीमध्ये त्यांना मदत करू लागला. 

वर्षा यांनी पडेल ते काम करायला सुरूवात केली. त्यांनी आपल्या शेतात ट्रॅक्टरसुद्धा चालवला आहे. त्यांच्या या प्रवासात अनेक अडचणी आल्या. नैसर्गिक संकटामुळे मोठे नुकसानही झाले पण त्यांनी आपला संघर्ष थांबवला नाही. २०१९ साली त्यांनी आपल्या मुलाचे लग्न केले आणि त्या स्थिरसावर झाल्या. त्यांच्या शेतात काम करण्यासाठी काही पूर्ण वेळ तर काही हंगामी कामगार आहेत. आर्थिक स्थिरसावर झाल्यानंतर त्यांनी टप्प्याने घर बांधले, शेतात आधुनिक तंत्रज्ञान वापरायला सुरूवात केली, ट्रॅक्टर घेतला, गाडी घेतली आणि आर्थिक उन्नती साधली. 

वर्षा यांच्या १० एकर द्राक्षबागेला वर्षाकाठी प्रतिएकर १ ते दीड लाखांचा खर्च येतो तर एकूण उत्पन्न हे ६ ते साडेसहा लाखांच्या आसपास आहे. सर्व खर्च वजा जाता त्यांना एकरी ५ लाखांचा निव्वळ नफा मिळतो. एकूण शेतातून त्यांना वर्षाकाठी ५० लाखांचा निव्वळ नफा मिळतो. शेतीतून मिळणाऱ्या नफ्यामुळे त्यांच्या कुटुंबात आर्थिक स्थैर्य आलंय असं त्या सांगतात. 

अवघ्या वयाच्या २१ व्या वर्षी एका बाळासहित पोरक्या झालेल्या आणि एक वेळ आत्महत्या करण्याचा विचार मनात आलेल्या वर्षा यांनी हे वैभव उभं केलंय. त्यांच्या तीस वर्षाच्या खडतर प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरेल.  

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीमहिलाद्राक्षे