आशुतोष कस्तुरे
कुंडल: बांबवडे (ता.पलूस) येथील तरुण शेतकऱ्याने २० गुंठे क्षेत्रात पहिल्या दोन पिकात ९ लाखांचे पेरूचे उत्पन्न घेतले तर या तिसऱ्या वर्षात पंधरा लाखांवर उत्पन्न घेण्याची जिद्द बाळगली आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू केले आहेत.
ही यशकथा आहे बांबवडे (ता.पलूस) चा तरुण शेतकरी विक्रम संकपाळ यांची. येथील काळ्या मातीच्या २० गुंठे क्षेत्रात शेताची उभी आडवी नांगरट करून, तीन फुटी बेड केला त्यामध्ये ७ ट्रेलर शेणखत घालून शिफारशीत आंतराप्रमाणे खड्डे काढून घेतले.
यामध्ये व्हिएनआर जातीचे पेरू वाण जानेवारी २०२२ साली लागण केली यासाठीची रोपे कलम केलेली वापरली. साधारण १५० रुपये प्रमाणे ४०० रोपे १० बाय ६ अंतरावर लावून जास्तीत जास्त हवा खेळती राहील अशी लागण केली आणि बुडक्यात ठिबक टाकले.
ठिबकद्वारे खते दिल्याने खतांची मात्रा आवश्यक तेवढी देऊन खर्च आटोक्यात आणला गेला. पाणी आणि माती परीक्षनानुसार वेळोवेळी खतांची मात्रा देऊन झाडांची निगा राखली.
त्यानंतर झाडे टुमदार झाल्यावर दहाव्या महिन्यात त्यांची छाटणी घेतली आणि पीक धरले तिथून सात महिन्यात पहिले पिक घेतले.
या वीस गुंठे क्षेत्रातून पहिल्या वर्षी ५ टन पेरूचा माल आला तो मुंबईच्या मार्केटमध्ये पाठवला आणि दर प्रति किलो ६५ रुपये लागला होता याचे अंदाजे ३ लाख रुपये झाले.
त्यानंतर झाडांची लगेच छाटणी घेऊन पुन्हा पीक धरले आणि पुढील सात महिन्यात पुन्हा पेरू काढायला आले आणि ९ टन पेरूचा माल निघाला तो म्हैसूर येथे पाठवून त्याला प्रति किलो ७२ रुपये दर मिळाला यातून ६ लाखांचे उत्पन्न मिळाले.
आता पेरू बागेचे तिसरे पिक आहे. यंदा खतांची मात्रा आणि कीटकनाशके वेळच्यावेळी देऊन यंदा १५ टनापेक्षा पेक्षा जास्त उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे.
उन्हाच्या झळा वाढताना लहान पेरू उन्हाच्या तडाख्यामुळे पिवळा पडत असल्याने झाडांना शेडनेटने झाकून घेतले जाते. तसेच पेरूला पिशवी घातल्याने फळाचे संरक्षण केले जाते.
पेरू पिकाला जास्त करून मिलीबग कीड येत असल्याने यासाठी कीटकनाशक फवारणी करून ही कीड आटोक्यात आणून जास्तीत जास्त सुदृढ पाने ठेवण्याचा प्रयत्न केला.
शेती परवडत नाही, क्षेत्र कमी आहे असे सांगण्यासाठी ही पेरूची लागवड एक पथदर्शक उदाहरण आहे. कमी भांडवलात, वेळच्यावेळी नियोजन केले तर २० गुंठ्यांत पेरूच्या लागवडीतून लखपती होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही हे या शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीन रोजगार हमी अंतर्गत फळबाग लागवड योजनेतून खड्डे काढणी पासून ते पिक जाई पर्यंत मजुरी खर्च आणि सामुग्री खर्च दिला जातो यासाठी सुरुवातीला शेतकऱ्यांनी जॉबकार्ड काढणे गरजेचे आहे. शासनाच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा. - संभाजी पटकुरे, तालुका कृषी अधिकारी, पलूस
पेरू पिकाला कमी रोग आहे आणि आटोक्यात येणारा असल्याने थोड्या काळजीने चांगले उत्पन्न घेता येते. यासाठी पाण्याचे, खतांचे आणि शेतीच्या कामांचे वेळेत नियोजन महत्वाचे आहे. - विक्रम संकपाळ, शेतकरी