इंजिनिअरिंगचे शिक्षण करून नोकरी करत असताना शेतीमध्ये प्रयोग करण्याची आवड असलेला सांगली जिल्ह्यातील मयूर जगदाळे हा तरूण मोतीपालनातून (Pearl Farming Success Story) लाखोंचा नफा कमावत आहे. मोतीपालनातील शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून तो 'मोतीपालनातील मास्टर शेतकरी' बनला असून त्याच्याकडे देशभरातल्या विविध राज्यांतून शेतकरी प्रशिक्षणासाठी येतात ही त्याची उपलब्धी आहे.
मयूर जगदाळे हा तरूण मुळचा मेकॅनिकल इंजिनिअर. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आंधळी हे त्याचं गाव. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यात नोकरी करत असताना त्याला शेतीची आवड होती. त्यामुळे त्याने नोकरी करत असताना शेती विषयातील विविध प्रशिक्षण पूर्ण केले. आणि त्यानंतर २०१७-१८ मध्ये मोतीपालन सुरू केले.
सुरूवातील मयूरने एका टाकीपासून सुरूवात केली आणि या व्यवसायातील सखोल अभ्यास करण्यास सुरूवात केली. मोतीपालनातील विविध तंत्रज्ञान शिकून त्याने मोतीपालनाचा मोठा प्लँट उभारला आहे. सध्या राज्यातील मोतीपालनातील अग्रगण्य शेतकरी म्हणून मयूरची ओळख आहे.
मोतीपालनातील संधीभारतातील केवळ २ टक्के नागरिक मोतीपालन करतात. शिंपल्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे सौंदर्यप्रसाधनामध्ये उपयोग केला जातो. तर एक मोती (प्रक्रिया न केलेला) १०० रूपयांना विक्री होतो. तर हाच मोती वेगळे तंत्रज्ञान वापरून तयार केला असेल तर तो मोती २०० रूपयांना विक्री होतो. मोती १०० वर्षे ठेवला तरी खराब होत नाही. त्यामुळे मोतीपालनामध्ये खूप संधी असल्याचं मयूर सांगतो.
कसे केले जाते मोतीपालन?शिंपले हे मुळात सजीव असल्यामुळे आणल्यानंतर पाण्यात १० ते १५ दिवस ठेवावे लागतात. यासाठी तीन टाक्या बनवाव्या लागतात. प्री टँक, पोस्ट टँक आणि मेन टँक. पहिल्या टाकीत सेट झालेल्या शिंपल्यावर सर्जरी करून ते शिंपले पोस्ट टँकमध्ये ठेवले जातात. त्यानंतर पोस्ट टँकमध्ये काही शिंपले मरतात आणि उरलेले शिंपले पुढील दीड वर्षासाठी मेन टँकमध्ये शिफ्ट केले जातात. त्यानंतर फक्त पाणी तपासणे, त्यांना खाद्य देणे आणि आठवड्यातून एकदा २५ टक्के पाणी बदलणे एवढेच काम असते.
सौंदर्यप्रसाधनाचीही विक्रीमयूर हा मागणीनुसार मोती तयार करतो. वेगवेगळ्या देवीदेवतांच्या फोटोचे मोतीही तयार केले जातात. प्रक्रिया न केलेल्या मोत्यांपासून मयूर वेगवेगळ्या वस्तू बनवून तोही विक्री करतो.
प्रशिक्षणातून ७ ते ८ लाखमयूरने मोती पालनातील बारकावे जाणून घेतल्यामुळे तो यामध्ये एक्स्पर्ट झाला आहे. तर त्याच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी देशभरातील शेतकरी आले आहेत. आत्तापर्यंत त्याने जवळपास २०० लोकांना यशस्वी रित्या मोती पालनाचे प्रशिक्षण दिले असून प्रशिक्षण घेऊन गेलेल्या शेतकर्यांकडून तो मोती विकतही घेतो. प्रशिक्षणातून तो दरवर्षी ७ ते ८ लाखांचे उत्पन्न मिळवतो.
मोती पालनातून ७ ते ८ लाख प्रतिवर्षमयूरकडे मोती पालनाच्या दोन टाक्या आहेत. यामध्ये प्रत्येकी ३ हजार शिंपले ठेवले जातात. या माध्यमातून त्याला एका टाकीतून वर्षाकाठी ७ ते ८ लाखांचे उत्पन्न निघते असं मयूरने सांगितलं. प्रशिक्षण आणि मोती पालनातून प्रत्येक वर्षाला मयूर १७ ते १८ लाखांचे उत्पन्न कमावतो.
मोती पालनाबद्दल अनेक शेतकरी अनभिज्ञ असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न देणाऱ्या मोतीपालनाकडे वळावे असं मत मयूरने व्यक्त केलंय. मोती पालनाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून मयूर महाराष्ट्रातील मोतीपालनातील बादशाह बनला आहे. शेतकऱ्यांना उत्तम पद्धतीने प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक सक्षम करण्याचे मयूरचे ध्येय आहे.