सुरेंद्र शिराळकरआष्टा येथील अमोल लालासाहेब देसाई यांनी सातत्यपूर्ण टोमॅटोचीशेती करीत एकरी सरासरी पाच लाखांपर्यंत उत्पादन घेत युवा शेतकऱ्यांच्या पुढे आदर्श निर्माण केला आहे. पदवीधर असूनही नोकरीच्या मागे न धावता भाजीपाला पिकातून शेती कशी फायदेशीर होऊ शकते अमोल देसाई यांनी दाखवून दिले आहे.
अमोल देसाई यांची स्वतःची चार एकर शेती आहे. नोकरीपेक्षा शेतीला प्राधान्य देत सध्या त्यांनी स्वतःबरोबर इतरही शेतकऱ्यांची शेती कसण्यासाठी घेतली आहे. त्यांनी ऊस एक एकर, काकडी दोन एकर, केळी सव्वाएकर तसेच कोबी व फ्लॉवर यासह एक एकर टोमॅटोची लागवड केली आहे.
या पिकांना त्यांनी पाणी देण्यासाठी विहीर आणि कूपनलिकांची खुदाई केली आहे. आपल्या ३० गुंठे क्षेत्रात उभी, आडवी नांगरट करून त्यांनी शेणखत, कंपोस्ट खत घालून जमीन तयार केली आहे. सरी घेतल्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी मल्चिंग पेपर अंथरुण झिगझ्याग पद्धतीने अथर्व जातीच्या टोमॅटोच्या रोपांची लागवड केली. तार व काठीच्या आधाराने रोपे बांधून घेतली.
पाण्यासाठी ठिबकचा वापर केला. ठिबकने नियमित खते दिली असून कीटकनाशकाची गरजेनुसार फवारणी केली. सुमारे ६५ ते ७० दिवसानंतर टोमॅटो प्लॉट सुरू झाला. सुमारे दीड ते दोन महिने प्लॉट चालतो. सध्या आठ ते दहा तोडे झाले असून दहा किलो टोमॅटोला १५० ते २०० रुपये दर मिळतआहे.
उन्हाळा असल्याने ३० गुंठ्यात सुमारे चार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे. अमोल यांना रणजीत तळप, अतुल पाटील यांच्यासह रोपवाटिकेचे देवेंद्र गुरव व आई, वडील यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
गुंठ्याला टनाचे उत्पन्नअमोल देसाई म्हणाले, मागील सुमारे सहा वर्षापासून सातत्यपूर्ण टोमॅटोची लागवड करीत आहोत. उन्हाळ्यात टोमॅटोचे कमी तोडे मिळतात तर पावसाळा व हिवाळा या ऋतूमध्ये टोमॅटोचे उत्पादन चांगले मिळते. गुंठ्याला सरासरी एक टन उत्पन्न मिळते. गतवेळी दोन एकरात ७० ते ८० टन टोमॅटोचे उत्पादन झाले. याद्वारे सुमारे २० ते २५ लाखांचे उत्पन्न मिळाले होते. हा टोमॅटो कोल्हापूरसह स्थानिक आष्टा व इस्लामपूर बाजारपेठेतही विक्री केला होता.
अधिक वाचा: काय सांगताय मधमाशांचे हॉटेल.. हो पुण्यात मधमाशी संवर्धनासाठी सुरु झालंय 'हनी बी हॉटेल'