दादा चौधरी
भांडगाव: खोर (ता.दौंड) येथील युवा शेतकरी अक्षय शिवाजी चौधरी यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कलिंगड आणि मिरची पिकाचे योग्य नियोजन केले.
आधुनिक पद्धतीने शेती करून तीन एकरात जवळपास १२० टन कलिंगडाचे उत्पादन घेत ६५ दिवसात १० लाख रुपयांचे उत्पादन मिळवण्यात यश प्राप्त केले आहे.
त्याच्या ह्या यशामुळे अनेक तरुण शेतकऱ्यांना त्याचा आदर्श निर्माण झाला आहे. मुळातच शेतीची आवड असल्याने नोकरी न करता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय अक्षयने घेतला.
अक्षयने वडिलोपार्जित अर्धा एकर क्षेत्रावर शेततळे तयार केलेले आहे. यंदा तीन एकर क्षेत्रावर कलिंगडाची लागवड करून विक्रमी कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे.
अक्षयने प्रथम एकरी तीन ट्रॉली शेणखत व दोन ट्रॉली कोंबडखत टाकून पाच फुटाच्या अंतराने भेट तयार करून घेतले. बेड तयार केल्यानंतर ठिबक अंथरल्यावर कलिंगड लागवडीपूर्वी १.२५ मीटर रुंद आणि ४०० मिटर लांब प्रतिरोल सिल्वर मल्चिंग पेपर अंथरला.
यामुळे जमिनीचे तापमान, आर्द्रता अनुकूल राहून पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली झाली. तणांचे नियंत्रण झाले, खताची बचत झाली, काही प्रमाणात रस शोषक किडीचे नियंत्रण झाले.
तयार झालेल्या बेडवर रोपवाटीकेमधून आणलेल्या रोपांची लागवड केली. एकरी ८००० रुपये त्यांनी लावली. बेडमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, निंबोळी पेंड, तसेच रासायनिक खतांचा डोस दिला.
तसेच काही खते ड्रीपद्वारे सोडली. गरजेनुसार पाण्याचे योग्य नियोजन करून कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेतले. तयार झालेल्या एका कलिंगडाचे वजन सरासरी चार ते पाच किलो पर्यंत आहे.
अशा पद्धतीने नियोजन केल्याने ६५ दिवसांमध्ये कलिंगड विक्रीसाठी उपलब्ध झाले. मुंबईवरून व्यापारी आले आणि त्यांनी बांधावरच दहा रुपये प्रति किलोला भाव देऊन कलिंगड खरेदी केले.
एकरी ८० हजार रुपये, असा तीन एकरासाठी एकूण २ लाख ४० हजार रुपये खर्च आला. मेहनत, खत नियोजन, रोपे यांचा खर्च वजा जाता एकूण दहा लाखाचे उत्पादन अपेक्षित आहे.
अक्षयने कलिंगडा बरोबरच हिरव्या मिरचीचे एकरी ६००० रोपे लावून आंतरपीक घेतले आहे. संपूर्ण कलिंगड निघाल्यानंतर साधारणतः वीस दिवसांमध्ये मिरचीचे उत्पादन चालू होणार आहे.
तीन एकर मध्ये जवळपास २०० ते २५० क्विंटल हिरवी मिरची व ३० ते ४० क्विंटल लाल मिरचीचे उत्पादन अपेक्षित आहे. मिरचीतून साधारणता दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.