Join us

Young Farmer Success Story : कॉम्प्युटरवरील अमोलची बोटे चाखता आहेत गुऱ्हाळातील गुळाचा गोडवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 11:26 AM

दौंड तालुका हा सर्वाधिक ऊस उत्पादन करणारा तालुका आहे. नदीपट्ट्यातून उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यासाठी गुऱ्हाळघरांची आवश्यकता ओळखून अमोल गणपत मेमाणे यांनी गुन्हाळघर सुरू करण्याचा मानस घरी व्यक्त केला.

बापू नवलेदौंड तालुका हा सर्वाधिक ऊस उत्पादन करणारा तालुका आहे. नदीपट्ट्यातून उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यासाठी गुऱ्हाळघरांची आवश्यकता ओळखून अमोल गणपत मेमाणे यांनी गुऱ्हाळघर सुरू करण्याचा मानस घरी व्यक्त केला.

त्यास वडील गणपत मेमाणे आई लक्ष्मी व बंधू नितीन यांनी पाठबळ दिले. बहिण डॉ. जयश्री प्रकाश पाटील यांनी देखील या व्यवसायात प्राधान्य देत मार्गदर्शन केले. पत्नी रेखा व भावजय तृप्ती मेमाणे यांची मोलाची साथ लाभली आहे.

परप्रांतीय गुऱ्हाळ उद्योजक या परिसरात मोठ्या प्रमाणात व्यवसाय करत आहे. मात्र ती मक्तेदारी मोडून काढून मेमाणे यांनी ऊस खरेदी, गुळ उत्पादन व विक्री या तिन्ही व्यवसायात सक्षमपणे उतरून नवीन पायंडा पाडला आहे. यातून प्रेरणा घेऊन अनेक नव उद्योजक या व्यवसायात उतरले आहेत.

२००९ पुण्यातून कॉम्प्युटरची पदविका उत्तीर्ण झाल्यानंतर मेमाणे कॉम्प्युटर नावाने केडगाव येथे व्यवसाय सुरू केला होता. त्यामध्ये मन न रमल्याने गुऱ्हाळघरांची आवश्यकता वाटत असल्यामुळे सुरुवात केली.

सुरुवातीला व्यवसायाची पडझड झाली आणि चढउतारांना तोंड द्यावे लागले मात्र न खचता यशस्वी होण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. व्यवसायातील आधुनिकता ओळखत अत्याधुनिक यंत्रे खरेदी केली. मनुष्यविरहित स्वयंचलित गुऱ्हाळ असावे यासाठी प्रयत्न केले.

शेतकऱ्यांना उसाचे उत्पन्न अधिक झाल्यावर विक्री करणे कठीण जात होते. वेळेवर ऊस विक्री झाली नाही तर वजनात घट होण्याचा धोका मोठा होता. विक्री केल्यानंतर पैशांच्या स्वरूपात मोबदला तात्काळ मिळाला नाही तर शेतकऱ्यांची कुचंबना होत होती.

विक्रीचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे आर्थिक गोष्टींवर मात करीत वेळेवर शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांनी विश्वास टाकायला सुरुवात केली. या व्यवसायात सहकारी मित्र अमोल भांडवलकर, अमोल शेलार, हनुमंत पानसरे, भाऊसाहेब शेलार यांनी वेळोवेळी मदत केली.

त्यामुळे आज १०० हून अधिक लोकांना एका वेळी रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो. भारतातील कर्नाटक, तेलंगणा, गुजरात या राज्यामध्ये गुळाची निर्यात करू लागलो.

महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ या ठिकाणी देखील उच्च प्रतीचा गुणवत्तापूर्ण गुळ निर्मिती केल्यामुळे मागणीमध्ये वाढ झाली. केडगाव परिसरातील गलांडवाडी, हंडाळवाडी, खोपोडी, दापोडी, पारगाव, चौफुला, खुटबाव, बेटपाटी या भागातून शेतकऱ्यांनी ऊस दिला.

तसेच शिरूर तालुक्यातील रांजणगाव, नागरगाव, चिंचणी या भागातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ऊस दिला. बराच वेळा मालाची आवक झाल्यास शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी प्रतीक्षा करावी लागते.

लक्ष्मी गुळ उद्योग समूहाच्या माध्यमातून सेंद्रिय गुळ निर्मिती करण्याचा भविष्यात मानस आहे. विषमुक्त गुळ निर्मिती प्रक्रिया उद्योग करून परदेशात मागणीनुसार पाठवणार आहोत उसापासूनचे उपपदार्थ सेंद्रिय काकवी, रस, चिक्की, चॉकलेट क्यूब गूळ असे वेगवेगळे ग्राहकांच्या पसंतीचे प्रॉडक्ट बनवणार आहोत. शेतकऱ्यांच्या मालाला वाढीव दर मिळेल जगातील बाजारपेठा खुल्या होतील ही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी अपेक्षा आहे. - अमोल मेमाणे, संचालक लक्ष्मी गुळ उद्योग, टोल नाका, केडगाव, ता. दौंड

अधिक वाचा: एकेकाळी मजूर म्हणून काम करणारा हा शेतकरी आज पाच मजुरांना देतोय कायमस्वरूपी रोजगार.. वाचा सविस्तर

टॅग्स :ऊसशेतकरीशेतीकाढणी पश्चात तंत्रज्ञानअन्नपीक