मेहरून नाकाडेरत्नागिरी : उच्च शिक्षण घेऊन परदेशात चांगल्या पदावर नोकरी करून दोन जीवाभावाच्या मित्रांनी आपल्या लाल मातीशी असलेली बांधिलकी घट्ट जपली आहे.
आखाती प्रदेशात (दुबई) १७ वर्ष मल्टीनॅशनल कंपनीतील उच्च पदावरील नोकरी सोडून त्यांनी मायभूमीत बागायतीची कास धरली आहे. तिथे पाणी विकत घ्यावे लागते, याचा अनुभव गाठीशी ठेवून त्यांनी पाणी जिरवणे, शेततळे यासाठी प्राधान्य दिले आहे.
मुजम्मील अब्दुल करीम सावंत व केतन रविकांत सावंत या दोघांची घट्ट मैत्री. दोघेही उच्चशिक्षित. दुबईत उच्च पदावर नोकरी केल्यानंतर ते मायदेशात परतले. या दोन मित्रांनी रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे दहा एकर जागा घेतली. त्यामध्ये त्यांनी ४०० हापूस, १०० काजू, २७५ सागांची लागवड केली आहे.
शेतीला जोड म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यशेती सुरू केली आहे. पाण्यासाठी त्यांनी तीन शेततळी खोदली आहेत. पावसाचे पाणी या शेततळ्यांमध्ये साचते. त्यामुळे ऑक्टोबरपासून पाऊस थांबला तर नोव्हेंबरपासून बागायतीसाठी शेततळ्यातील पाण्याचा वापर करत आहेत.
याशिवाय 'गप्पी माशांची पैदास' हा प्रकल्पही सुरू केला आहे. लागवडीला सात वर्षे झाली असून, उत्पादन सुरू झाले आहे. पाण्याच्या मुबलक वापरामुळे तसेच खते, कीटकनाशकांचा मर्यादित वापर यामुळे काजू, आंबा पिकाचा दर्जा सर्वोत्तम राखण्याकडे त्यांचा अधिकाधीक कल आहे.
शेतीला जोडव्यवसाय सुरू केले असून, त्याव्दारे उत्पन्न सुरू झाले आहे. कोकणात निसर्गसौंदर्य उत्तम आहे. परदेशी नागरिकांनी मोठ्या संख्येने येऊन त्याचा आस्वाद घ्यावा, अशी दोन मित्रांची इच्छा असून, त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
मत्स्यशेतीतून उत्पन्नदोन्ही मित्र मत्स्यशेती करत आहेत. त्यामध्ये विविध प्रकारचे मासळीचे बीज टाकून उत्पन्न घेतात. शिवाय शोभिवंत मासे हा व्यवसायही सुरू आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार डोके वर करतात. या आजारांचा फैलाव डासांपासून होतो. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गप्पी मासे फायदेशीर ठरतात. त्यामुळे दोन्ही मित्र गप्पी माशांची पैदास हा उपक्रम राबवत आहे. गप्पी माशांना मागणी तर आहेच शिवाय मोठ्या माशांचे खाद्य म्हणून गप्पी माशांचा खप मोठ्या प्रमाणावर होत आहे. डासांच्या निर्मूलनासाठी तर सर्वाधिक मागणी होत आहे.
कृषी पर्यटन व्यवसायकोकणाला निसर्गसौंदर्याचे वरदान आहे. त्यामुळे परदेशातील पर्यटक कोकणात यावेत, त्यांनी येथील निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घ्यावा, यासाठी दोन्ही मित्र प्रयत्नशील आहेत. शेतीला जोडून विविध व्यवसाय करतानाच कृषी पर्यटन व्यवसायही सुरू केला आहे. बागायतीमध्येच पर्यटकांसाठी निवास व्यवस्था उभारली आहे.
आखाती प्रदेशात नोकरी करताना पाणी विकत घ्यावे लागत असे. परंतु, कोकणात सर्वाधिक पाऊस पडूनही पाणी वाया जाते. त्यापेक्षा पाणी जमिनीत जिरवले तर भविष्यात टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. निव्वळ हाच उद्देश समोर ठेवत पावसाचे पाणी साठविण्यासाठी तीन शेततळी उभारली आहेत. उन्हाळा सुरु झाला की, बागायतीला त्याचा फायदा होतो. निव्वळ शेती करण्यापेक्षा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवत शेती करावीच शिवाय शेतीला संलग्न मत्स्य, कुक्कुटपालन, शेळीपालन व्यवसाय सुरू केले तर त्यामुळे उत्पन्नात भर पडते. - मुजम्मील व केतन सावंत