अतुल जाधवदेवराष्ट्रे : भाजीपाला पिकात सातत्य व कष्ट करण्याची धमक असेल तर शेतकरी भरपूर पैसे मिळवू शकतो हे आसद (ता. कडेगाव) येथील युवा शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.
रणजित जाधव यांनी टोमॅटो पिकामध्ये एकरी ३९ टनाचे विक्रमी उत्पादन घेऊन तब्बल १५ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. टोमॅटोचे दर वाढल्याचा फायदा झाला आहे, असे युवा शेतकरी रणजित जाधव यांनी सांगितले.
आसद येथील रणजित जाधव हा शेतकरी नेहमी वेगवेगळी भाजीपाल्याची पिके घेत आहे. टोमॅटो, वांगी, सिमला मिरची अशी भाजीपाल्याची पिके नेहमी घेत आहेत. त्यांनी ५ मार्चला अथर्व जातीच्या टोमॅटो पिकाची एक एकर लागवड केली.
यासाठी त्यांना सात हजार ५०० रुपयांचा मल्चिंग पेपर हातरून झिकझ्याक पद्धतीने त्यांनी रोपांची लागवड केली. लागवड करण्यापूर्वी त्याने शेताची योग्य मशागत करून एक एकराला सहा ट्रॉली शेणखत घातले होते.
ठिबकद्वारे रोपांना पाणी, खते दिली जात आहेत. या ठिबकच्या माध्यमातून आळवणी खते, औषधे दिली जात आहेत. टोमॅटो पिकाचा प्लॉट एकदम भरात आल्यानंतर वेळोवेळी त्या पिकाला भेसळ पद्धतीचे लागवड डोस दिले. रोपांच्या लागवडीपासूनच वेगवेगळ्या औषध फवारण्या दिल्या.
बांबूच्या काठीचा मांडव घालून टोमॅटोच्या रोपांची योग्य बांधणी करून घेतली. योग्यवेळी फवारण्या व खते दिल्यामुळे झाडावरील फळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. एका फळाचे वजन सरासरी ९० ते १०० ग्रॅमपर्यंत पोहोचले होते.
प्रत्येक तोड्याला पाच ते सात टन माल निघाला. एकरी सरासरी ३९ टन उत्पादन घेतले असून त्यातून १५ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. रोजगारी, खते, बी-बियाणे यांचा खर्च वजा जाता निव्वळ नफा १२ लाख रुपये झाल्याचे रणजित रवींद्र जाधव यांनी सांगितले.
शेतीबाबत नकारात्मक भूमिका बाजूला ठेवागेल्या तीन वर्षांपासून रणजित जाधव हा शेतकरी वेगवेगळ्या पिकांची लागवड शेतामध्ये करत आहे. त्याला वांगी, ढब्बू मिरची या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळाला होता. त्यामुळे त्याने भाजीपाला पिकामध्ये सातत्य ठेवले. युवकांनी शेती क्षेत्रामध्ये नकारात्मक भूमिका बाजूला सोडून भाजीपाला पिकामध्ये सातत्य ठेवावे. निश्चित शेती फायदेशीर असून तुम्ही शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू शकता, असे आवाहन युवा शेतकरी रणजित जाधव यांनी तरुणांना केले आहे.