विजयकुमार गाडेकर
अहमदनगर जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर हे तालुके कायम दुष्काळाच्या झळा सोसत आले आहेत. पाण्याची समस्या असल्याने येथे शेती विकसित होत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत पारनेर येथील तरुणाने शिक्षणाची कास धरत, मातीला सुवर्णगंध देणाऱ्या गांडूळ निर्मितीचा प्रकल्प उभारून विदेशात गांडूळ निर्यात केली आहे. गांडूळ निर्यात करणारा हा प्रयत्न देशात प्रथम ठरला. पाटोदा तालुक्यातील पारनेर येथील अमरनाथ अंदूरे पाटील या तरुणाने ॲग्रीकल्चरचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी २०१५ मध्ये पाच एकर क्षेत्रात कोरफड लागवड केली. १० गुंठे क्षेत्रावर गांडूळ उद्योग सुरू केला.
हवामान, ऋतूनुसार वर्षाकाठी एक किलो गांडूळाचे शंभर किलोमधे रूपांतर होत गेले. गांडूळ निर्मिती करत जिवंत गांडूळ भारतातून प्रथमच निर्यात करण्यास सुरूवात केली. २०२१ साली अंदूरे यांनी ओमान, सिंगापूर, युएस, साऊथ आफ्रिका, सौदी अरेबिया या देशात गांडूळ निर्यात केली आहे. बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या या प्रकल्पाची वार्षिक उलाढाल ५० लाख ते १ कोटीपर्यंत पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत पत्राद्वारे अंदूरे यांचे कौतुक केले आहे तसेच दादासाहेब भुसे यांनीदेखील सत्कार करून प्रोत्साहन दिले.
जिल्ह्यात दुसरा निर्यातदार बीड जिल्ह्यातून विदेशात ब्लिचिंग
पावडर निर्यात करणारे मधुकर भांडेकर हे पहिले उद्योजक आहेत. आता पारनेर येथील अमरनाथ अंदूरे हे जिवंत गांडूळ निर्यात करणारे दुसरे उद्योजक ठरले आहे. कठीण परिश्रम, जिद्द असल्यास यशस्वी होता येते. त्यासाठी तरुणांनी संधीची वाट न बघता स्वतः संधी निर्माण करावी, असे अंदूरे यांनी सांगितले.