सोलापूर: सोलापुरातील करमाळा तालुक्यातील केत्तूर नं.२ या गावातील विनोद नवले आणि रणजित नवले या तरूणांनी आंतरपीक म्हणून बिगर हंगामी कलिंगड पिकाची लागवड करून चांगला नफा कमावला आहे. युपीएससीची तयारी करता करता शेतीमध्ये पाऊल ठेवलेल्या विनोदने शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले आणि त्यामध्ये यशस्वीही झाला. त्याच्या शेतीमध्ये सध्या कलिंगड, पेरू, केळी, उस हे पिके आहेत.
दरम्यान, दोन एकर पेरू बागेमध्ये आंतरपीक म्हणून विनोदने कलिंगडाची लागवड केली. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यातच साधारण कलिंगडाचा हंगाम संपतो. पण या पठ्ठ्याने पेरूच्या दोन ओळीमध्ये एक कलिंगडासाठी बेड तयार केला आणि २५ मे रोजी लागवड केली. त्यातून तब्बल ३३ टन कलिंगडाचं उत्पादन घेतलंय. युपीएससी करून शेतीमध्ये नशीब आजमावणाऱ्या विनोद आणि त्याचा भाऊ रणजित यांनी बिगर हंगामी कलिंगडाच्या लागवडीतून तरूण शेतकऱ्यांसमोर वेगळा आदर्श निर्माण केलाय.
लागवडकलिंगडाच्या सिंबा या वाणाची २५ मे रोजी लागवड केली. पावसाळ्यामध्ये या वाणाच्या कलिंगडाला लाल रंग येतो आणि फळाचा आकारही चांगला वाढतो म्हणून या वाणाची निवड केली. पेरूच्या १० फूट अंतरावरील दोन ओळीमध्ये एक बेड तयार करून त्यावर सव्वा फुटावर लागवड केली. पहिल्या सव्वा फुटावर २ आणि दुसऱ्या सव्वाफुटावर १ रोप लावले. खतेरोपे लावल्यानंतर ह्युमिक एसिड आणि १९:१९:१९ ची आळवणी करुन घेतली. त्यानंतर दुसरी आळवणी बुरशीनाशकाची आणि कीटकनाशकांची घेतली. बेसल डोसमधे एकरी १ युरिया, २४:२४:००, स्मार्ट मील सेंद्रिय खत ४ बॅग, १०:२६:२६च्या २ बॅग , सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि आपण घरीच बनवलेले गांडुळखत वापरले. खतांमध्ये १२:६१, सॉइल चार्जर तसेच सॉइल मल्टिप्लायर, २४:२४:००, १३:४०:१३, १३:००:४५, ००:५२:३४, ००:६०:२०, ००:०९:४६, पोटॅशिअम shonite calcium मॅग्नेशिअम बोरान सारखी खते ड्रिप मधून वापरले.
फवारणीसाधारणपणे ४-५ दिवसाच्या अंतराने फवारण्या घेतल्या. एकूण ७ ते ८ फवारण्या झाल्या. नाग अळीसाठी, सूक्ष्मअन्नद्रव्याची म्हणजेच कॅल्शिअम झिंक बोरॉनची फवारणी तसेच बुरशिनाशके काँटॅक्ट आणि सिस्टेमिक यांचा वापर केला.
तंत्रज्ञानाचा वापरकलिंगडासाठी दिली गेलेली सर्व खते ठिबक सिंचन आणि एचटीपीच्या साहाय्याने सोडली गेली. त्याचबरोबर मल्चिंक पेपरचा वापर करून कलिंगडाची लागवड केल्यामुळे फवारणीचा खर्च वाचला, रोगराई कमी आली, पाणी कमी लागले आणि फळांची गुणवत्ता चांगली राहिली.
मार्केटचा अभ्यासऑफ सीझन कलिंगडाची लागवड करण्यासाठी पुणे आणि वाशी मार्केटला भेट देत येथील दरांचा अंदाज घेतला. त्याचबरोबर जवळपास २० ते २५ व्यापाऱ्यांना संपर्क करून मार्केटमधील दरांचा अंदाज घेतला होता. त्यानुसारच लागवड आणि मालाची विक्री केली. यामुळे शेतातूनच १३ रूपये प्रतिकिलो प्रमाणे मालाची थेट विक्री झाली.
उत्पन्नयोग्य आणि अचूक व्यवस्थापनामुळे माल साधारणपणे ५२ दिवसांत तोडायला तयार झाला.या मालाची ५५ व्या दिवशी जागेवरूनच व्यापाऱ्याला विक्री केली. जागेवरूनच १३ रूपये किलोप्रमाणे मालाची विक्री झाली. दोन एकर पेरूच्या १० फुटांवरील बेड मधून ३० टन चांगला माल आणि ३ टन कचरी माल निघाला. कचरी माल पुणे मार्केटला ११ रूपये किलो प्रमाणे विक्री केला. कलिंगडाच्या विक्रीतून ४ लाख २० हजारांचे उत्पन्न मिळाले. त्यातील १ लाख ३० हजारांचा खर्च वजा जाता २ लाख ९० हजार रूपये नफ्याच्या स्वरूपात मिळाले.
ऑफ सिझन (बिगर हंगामी) लागवड का केली?कलिंगड हे उन्हाळी पीक आहे. पण आर्थिक गणिते आणि मार्केटचा पूर्ण अभ्यास केल्यावर असे समजले की, कलिंगड पिकाला पावसाळ्यात खूप चांगले दर असतात . कधी कधी तर ३० रूपये किलोपर्यंत दर पोहोचतात. तसेच पावसाळ्यात लागवडी देखील कमी असतात आणि शहरांमध्ये मॉल पद्धतीमुळे, हॉटेलमध्ये सलाड म्हणून तसेच जिम करणारे त्यांच्या आहारामध्ये कलिंगडाचा वापर करतात. त्यामुळे ऑफसीझनला लागवड केली.- विनोद नवले (तरूण प्रयोगशील शेतकरी, करमाळा)