पुणे : भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान देशात पुरूषप्रधान संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी म्हटलं की शेतात काम करणारा किंवा आभाळाकडे बघणारा शेतकरी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. पुढाकाराने शेती करणाऱ्या महिला आपल्याला क्वचितच दिसतात. पण मुंबईसारख्या शहरात लहानाच्या मोठ्या झालेल्या, लग्न होऊन पुण्यात आलेल्या, शेतीची कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना शेती करण्याचं धाडस करत त्यातून चांगलं अर्थार्जन करण्याचा पराक्रम एका महिलेने केला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर परिसरात पॉलीहाऊस भाड्याने घेऊन जवळपास एक लाख २५ हजारांचे प्रतिमहिना उत्पन्न काढण्याचा पराक्रम करणाऱ्या हर्षदा सोनार या महिलेचा हा प्रवास...
साधारण आठ वर्षापूर्वी हर्षदा या पुण्यातील नामांकित कंपनीत एचआर अॅडमिन पदावर काम करायच्या. नोकरी करत असताना विक्रेत्यांकडील गुलाबाचे फुलं पाहून त्यांना आकर्षण वाटायचं. त्यानंतर हे फुल कसं तयार होत असेल? याची शेती कशी केली जात असेल? असे प्रश्न मनात येऊ लागले. गुगलवरून गुलाब शेतीची माहिती घेतल्यानंतर उत्साह वाढला आणि २०१६ साली हर्षदा यांनी गुलाब शेती करायचं ठरवलं.
गुलाब शेतीतील छोट्या गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांनी शिक्रापूर, तळेगाव येथील ओळखीच्या गुलाब उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन माहिती घेतली. नंतर शिक्रापूर येथे वीस गुंठे आकाराचे पॉलीहाऊस भाड्याने घेतले आणि त्यामध्ये गुलाब शेती सुरू केली. त्या पुणे शहरात राहत असल्याने बसने प्रवास करत शिक्रापूर येथे ये-जा करत असत. सुरूवातीला त्यांना शेतीत काम करण्याचा अनुभव नसल्यामुळे अनेक अडचणी आल्या. घरातल्या कुणालाच शेतीचा अनुभव नसल्यामुळे त्यांना एकटीलाच सगळे नियोजन करावे लागायचे. त्यांच्या शेतीमध्ये एकूण चार कामगार काम करतात.
खते, किटकनाशके, कटिंग, क्लिपिंग, बेडिंग ही कामे हळूहळू त्या शिकल्या आणि त्यानुसार शेतीमध्ये नियोजन करणे सुरू केले. एकदा गुलाब तोडले की त्या जागेवर दुसरे गुलाब यायला साधारण ४० दिवस लागतात. त्यानुसार येणारे सण, उत्सव आणि बाजारात होणारी आवक याचा अभ्यास करून नियोजन करत गेल्या आणि त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले. लग्नसराई, व्हलेंटाईन डे या सीझनमध्ये सर्वांत जास्त मागणी असते. त्यानुसार कटिंग, बिल्डिंग, क्लिपिंग, खतांचा डोस कमी-जास्त करणे अशा विविध गोष्टींचे नियोजन हर्षदा यांच्याकडून केले जाते.
पुढे कोरोनाच्या लाटेनंतर त्यांनी खेड-शिवापूर परिसरात एका एकराचे पॉलीहाऊस भाड्याने घेऊन गुलाब शेती सुरू केली. मी उत्पादित केलेल्या गुलाबाची क्वालिटी उत्तम असल्यामुळे बाजारात माझ्या नावावरच चांगला भाव मिळतो. काही फुल विक्रेते माझ्याकडून माल थेट विकत घेतात तर मी स्वत:ही डेकोरेशन आणि पुष्पगुच्छांच्या ऑर्डर स्विकारते असं हर्षदा सांगतात.
व्हॅलेंटाईनमध्ये चांगली मागणी
व्हॅलेंटाईनचा आठवडा प्रेमाचा आठवडा म्हणून तरूणांकडून साजरा केला जातो. त्यामुळे या आठवड्यामध्ये गुलाबाला चांगली मागणी असते. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच गुलाबाला मागणी वाढते. तर ७ ते १४ फेब्रुवारी या आठवड्यामध्ये गुलाबाला चांगला दर मिळतो.
खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ
एका एकरामध्ये भाड्याने घेतलेल्या पॉलीहाऊसचे भाडे ३० हजार रूपये एवढे आहे. तर एकूण चार कामगारांचे पगार, खत, कीटकनाशके असे मिळून साधारण 85 हजार ते 90 हजार रुपये प्रत्येक महिन्याचा खर्च होतो. पॉलिहाऊस मध्ये रोज एका एकरातून साधारण 800 ते 1200 फुलांचे हार्वेस्टिंग केले जाते. २० फुलांचा एक गुच्छ असतो. बाजारातील आवक पाहून गुच्छांचे दर ठरत असतात.
कमीत कमी ३० रूपये तर जास्तीत जास्त २५० ते ३०० रूपये गुच्छ याप्रमाणे दर मिळतो. गणपती उत्सवापासून व्हॅलेंटाईनच्या आठवड्यापर्यंत गुलाबाला चांगली मागणी असते. तर इतर महिन्यात कमी मागणी असते त्यामुळे दर कमीजास्त होत असतात. वर्षातील कमीजास्त भावांची सरासरी काढली तर प्रतिमहिना १ लाख २५ हजारांपर्यंतचे उत्पन्न हर्षदा यांना मिळते.
शेतीची पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर अनेक अडचणी आल्या. सुरूवातीला शिक्रापूर येथे पॉलीहाऊस भाड्याने घेऊन ४ वर्षे तर खेड शिवापूर येथे मागच्या तीन वर्षांपासून गुलाब शेती करत आहे. आमच्या गुलाबाची क्वालिटी उत्तम असल्यामुळे बाहेर पाठवले जातात. शेतकऱ्यांनी बाजारभाव पाहून उत्पादन काढले पाहिजे. सेंद्रीय खतांचा वापर केल्यामुळे खर्च कमी करता येऊ शकतो. माझ्या यशामध्ये माझे कामगार आणि कन्सल्टंट डोंगरे सर यांचा मोठा हातभार आहे .
- हर्षदा सोनार (गुलाब उत्पादक शेतकरी)