रत्नागिरी : कोकणात झेंडूच्या फुलांचे उत्पादन घेतले जात नसल्याने दसरा दिवाळीला झेंडूची फुले घेऊन घाट माथ्यावरून बरेच व्यापारी कोकणच्या विविध बाजारात येतात.
मात्र, संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील युवा शेतकरी शुभम दोरकडे यांनी आपल्या घराशेजारी झेंडूची लागवड केली आहे. त्यामुळे कोकणातील लाल मातीही झेंडूचे शिवार बहरले जाऊ शकते, हे त्यांनी आपल्या लागवडीतून दाखवून दिले आहे.
शुभम दोरकडे यांनी कृषी पदवी घेतली आहे. आपल्या शेतात ते वडील संतोष, आई सविता आणि बहीण प्रणिता यांच्या मदतीने शेतीमधील विविध प्रयोग करत असतो. यावर्षी घराच्या शेजारी असणाऱ्या जागेत त्यांनी झेंडूची लागवड केली आहे.
जून महिन्यामध्ये ही लागवड पूर्ण केली आहे. त्यांनी सेंद्रिय खत आणि जीवामृतची फवारणी करून फुलांची लागवड केली आहे.
केशरी आणि पिवळा अशा रंगांमध्ये झेंडू फुललेला पाहून संगमेश्वर देवरुख मार्गावरून जाणारे वाहनचालक आणि प्रवासी झेंडूचा सोनेरी मळा पाहण्यासाठी आवर्जून थांबतात.
दोरकडे यांनी आपल्या घराजवळच कृष्णाई या नावाने नर्सरी सुरू केली असून, शुभमच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण दोरकडे कुटुंब विविध प्रकारची रोपं स्वतः तयार करुन त्यांची विक्री करत आहेत.
झेंडू, पालेभाजी आणि शेती विषयक विविध उत्पादनांची विक्री करण्यासाठी दोरकडे यांनी आपल्या घराजवळच विक्री केंद्र सुरू केले आहे.
शुभम दोरकडे यांनी शेतात पूर्णतः सेंद्रिय खतांचा वापर केला आहे. लाल मातीत झेंडूच्या फुलांची शेती करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. झेंडूचे उत्पादन होत नसल्याने घाट माथ्यावर झेंडू बाजारात.
वानरांच्या उपद्रवातून मुक्ती मिळावी
झेंडूबरोबरच आम्ही विविध प्रकारची पालेभाजी, अन्य भाज्या यांचीही लागवड करतो. झेंडूच्या उत्पादनानंतर आम्ही कलिंगडाची लागवड करतो. मात्र, शेतात राबून आम्ही जेवढे कष्ट करतो तेवढं उत्पादन वानरांकडून होणाऱ्या उपद्रवामुळे हाती येत नाही. कष्ट करण्यापेक्षा शेतात राखण करण्यावरच अधिक भर द्यावा लागतो. वानरांच्या त्रासातून मुक्ती मिळावी, अशी अपेक्षा संतोष दोरकडे याने व्यक्त केली आहे.
अधिक वाचा: Farmer Success Story : भरत व भक्ती यांचा बारमाही भाजीपाला शेतीचा यशस्वी पॅटर्न वाचा सविस्तर