Lokmat Agro >हवामान > नगर-नाशिकहून जायकवाडीसाठी सोडावे लागणार ११ ते १३ टीएमसी पाणी, कारण...

नगर-नाशिकहून जायकवाडीसाठी सोडावे लागणार ११ ते १३ टीएमसी पाणी, कारण...

11 to 13 TMC of water to be released for Jayakwadi from Nagar and Nashik | नगर-नाशिकहून जायकवाडीसाठी सोडावे लागणार ११ ते १३ टीएमसी पाणी, कारण...

नगर-नाशिकहून जायकवाडीसाठी सोडावे लागणार ११ ते १३ टीएमसी पाणी, कारण...

यंदा कमी पाऊसमान पडल्याने नाशिक-नगरमधील धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडावे अशी मागण आता जोर धरत आहे. त्यातून नाशिक-नगर विरूद्ध मराठवाडा असा संघर्षही होण्याची शक्यता आहे.

यंदा कमी पाऊसमान पडल्याने नाशिक-नगरमधील धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडावे अशी मागण आता जोर धरत आहे. त्यातून नाशिक-नगर विरूद्ध मराठवाडा असा संघर्षही होण्याची शक्यता आहे.

शेअर :

Join us
Join usNext

हरिश्चंद्र चकोर, संगमनेर
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, अहमदनगर या जिल्ह्यांसाठी संजीवनी असलेल्या व गोदावरी नदीवर पैठण जवळ बांधण्यात आलेल्या जायकवाडी धरणामध्ये दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी एकूण पाणीसाठा ६२.२१०५ टी.एम.सी. (६०.५६%) व उपयुक्त पाणीसाठा ३६.१४४३ टी.एम.सी.(४७.१४%) इतका असून गतवर्षीच्या उपयुक्त पाणीसाठापेक्षा तो सुमारे ४० टी.एम.सी.(५३% टक्के) कमी आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील शेतीसिंचनावर मोठा परिणाम होणार असून पिण्याच्या पाण्याचा सुद्धा काटकसरीने वापर करण्याची आवश्यकता भासणार आहे. जायकवाडी धरण बांधताना धरण स्थळी उपलब्ध होणारा येवा(yield-यिल्ड )लक्षात घेऊनच या धरणाचा  एकूण पाणीसाठा १०२.७३ टी.एम.सी. निश्चित करण्यात आला होता. परंतु जायकवाडी धरणाच्या वरील(उर्ध्व )भागामध्ये गोदावरी नदी च्या खोऱ्यात नाशिक व नगर जिल्ह्यात जनतेच्या मागणी ‌ व गरजेनुसार मोठ्या प्रमाणात धरणे बांधण्यात आली व त्यामुळे वरील भागाचा  पाणी वापर जवळपास एकशे पंधरा(११५) टी.एम.सी. पर्यंत गेलेला आहे आणि तो भविष्यात १४५ ते १५० टी.एम.सी. पर्यंत जाऊ शकतो.  त्यामुळे जायकवाडी धरणामध्ये मोठी पाणी तूट सातत्याने यापुढे निर्माण झालेली पाहायला मिळणार आहे व त्या अनुषंगाने मराठवाडा विरुद्ध नाशिक -नगर हा संघर्ष सातत्याने उग्ररूप धारण करणार आहे. 

या सर्व बाबींच्या व अडचणींच्या पार्श्वभूमीवर  सन २००५ मध्ये  शासनाकडून समन्यायी पाणी वाटप कायदा मंजूर  करण्यात आला आणि त्यानुसार मेंढीगिरी समितीच्या काही शिफारशी  स्वीकारण्यात करण्यात आल्या. त्यामध्ये जायकवाडी धरणात दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी सुमारे ४९.८४ टी.एम.सी. म्हणजेच ६५% टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा प्रथमतः करण्यात यावा तनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील गोदावरी धरण समूह व नगर जिल्ह्यातील मुळा प्रवरा धरण समूहांमधून जायकवाडी धरणामध्ये ६५% टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी  कमी पडणारे पाणी सोडण्यात यावे आणि त्यानुसार जायकवाडी धरणामध्ये दरवर्षीच्या १५ ऑक्टोबर रोजीचा उपयुक्त पाणीसाठा विचारात घेऊन पुढील रब्बी व उन्हाळी हंगामासाठी म्हणजे सिंचनासाठी विचारात घेतला जातो. 

तर जायकवाडीला सोडावे लागणार १० ते ११ टीएमसी
सुमारे ४९.८४ टी.एम.सी. इतका उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ६५%टक्के इतका पाणीसाठा प्रथमतः करण्यात यावा व त्यासाठी वरील धरणांमधून पाणी सोडण्यात यावे असे नमूद केले आहे व त्या अटीनुसारच वेळोवेळी जायकवाडी धरणामध्ये नाशिक जिल्ह्यातील गोदावरी धरण समूहांमधून व अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे व मुळा धरण (प्रवरा- मुळा नदी ) धरण समूहांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडलेले आहे. मात्र यंदा जायकवाडी धरणामध्ये या वर्षीच्या १५ ऑक्टोबर रोजी  जायकवाडी धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा हा ३६.१४ टी.एम‌.सी. म्हणजेच (४७.१४%) टक्के इतका असून साधारणतः  तो १३.७० टी.एम.सी. वापरण्यासाठी कमी (शॉर्ट फॉल)प्रमाणात उपलब्ध होणार  आहे. 

त्यास्तव जायकवाडी धरणात नाशिक- नगर जिल्ह्यातील धरणांमधून साधारणतः दहा ते अकरा (१० ते ११) टी.एम.सी. इतके पाणी सोडणे अपरिहार्य ठरणार आहे. त्या अनुषंगाने मराठवाडा पाणी परिषद व  जनतेकडून  नाशिक-नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे . तर नगर व नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी सोडू नये अशी जोरदार मागणी होत असून पाणी सोडण्याच्या कार्यवाहीला मोठ्या प्रमाणात विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

यंदा किती पाणी जायकवाडीकडे झेपावले?
यावर्षी जून २०२३ अखेर जायकवाडी धरणामध्ये अंदाजे २०.३१९० टी.एम.सी.(२६.५०%) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलेला होता. यावर्षीच्या पावसाळ्यात ०१ जून ते १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत जायकवाडी धरणामध्ये २४.३४९० टी.एम.सी. इतकी  नवीन पाणी आवक झालेली आहे, त्यामध्ये प्रामुख्याने नांदूर मध्यमेश्वर बंधारा येथून (गोदावरी नदी) सुमारे १६.४८१ टी.एम.सी. इतके पाणी गोदावरी नदी द्वारे जायकवाडी धरणाकडे  सोडण्यात आले आहे. तसेच भंडारदरा व निळवंडे धरणातून देखील ओझर बंधाऱ्यावरून (प्रवरा नदी)सुमारे ३.६०६ टी.एम.सी. पाणी जायकवाडी धरणाकडे  वाहून गेलेले आहे.

जायकवाडीतील किती पाण्याचा वापर झाला
जुलै २०२३ ते १५ ऑक्टोबर २०२३ या कालावधी दरम्यान जायकवाडी धरणामधून झालेला कालवा पाणी वापर ३.१३४४ टी.एम.सी. इतका असून बिगर सिंचन उपसा सिंचन योजनांचा (पिण्यासाठी पाणी व औद्योगिक पाणी पुरवठा) वापर हा १.०९५८ टी.एम.सी. व जायकवाडी धरणाच्या पाणी साठ्यातून जलसंपदा विभागाने  शेती  सिंचनासाठी मंजुरी दिलेल्या उपसा सिंचन योजनांचा पाणी वापर हा  सुमारे १.१४९१ टी.एम.सी. इतका पाणी वापर झालेला आहे. 

त्याचबरोबर जायकवाडी धरणातील उपरोक्त कालावधी मधील बाष्पीभवन व्यय(Evaporation losses) जवळपास २.३३४३ टी.एम.सी. इतका नोंदविण्यात (Observed)आला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील या  वर्षीचा १ जूनन  ते दि .१५ऑक्टोबर २०२३ पर्यंत एकूण पाणी वापर अंदाजे ७.८४९६ टी.एम.सी. इतका झालेला आहे . 

सध्या जायकवाडीत पाणी आहे तरी किती
या सर्व बाबींचा विचार करता वापरासाठी सद्यस्थितीमध्ये जायकवाडी धरणामध्ये ३६.१४४३ टी.एम.सी. म्हणजेच (४७.१४%) टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यानुसार मराठवाड्यातील सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी जलसंपदा विभाग व शासनास काटेकोरपणे नियोजन करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. 

यावर असा आहे उपाय, मात्र
या सर्व अडचणींवर पाणी कमतरता  (shortage of water)या प्रश्नावर मंजूर राज्य एकात्मिक जल आराखड्यानुसार पश्चिम वाहिनी नद्यांचे घाटमाथ्यावरून अरबी समुद्राकडे वाहून जाणारे सुमारे ११५ टी.एम.सी. इतके अतिरिक्त पाणी गोदावरी नदीमध्ये अर्थात मराठवाड्याकडे वळविणे किती गरजेचे आहे याचा देखील शासनाने गांभीर्याने विचार करणे अत्यावश्यक आहे. 

सद्य: स्थितीमध्ये पावसाचे प्रमाण हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे व  सततच्या हवामान बदलामुळे कमी /अधिक झालेले दिसत असून नेहमी गोदावरी खोऱे हे  पाणी तुटीचे असलेले पहायला मिळते आहे, याचा देखील शासनाने युद्ध पातळीवर विचार करणे अत्यावश्यक ठरले आहे. 

सदरहू ११५ टी.एम.सी. पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपसा सिंचन योजनांची निर्मिती करावी लागणार असून नाशिक जिल्ह्यातील व नगर जिल्ह्यातील प्रवाही पाणी वळण योजनांचा देखील विचार करणे गरजेचे आहे. जवळपास ३० प्रवाही योजना मंजूर झाल्याचे ऐकिवात असून येत्या एक दोन वर्षात अंदाजे केवळ तीन (३)टी.एम.सी. इतकेच पाणी  वळविले जाणार असल्याने सद्य:स्थितीत संभाव्य निर्माण झालेली सुमारे २५ ते ३० टी.एम.सी. इतकी पाणी तुट कशी भरून काढली जाईल व उर्वरित ९३ टी.एम.सी. पाणी गोदावरी नदी  खोऱ्यामध्ये आणण्यासाठी हे काम किती कालावधीत होईल याबाबत अंदाज वर्तविणे कठीण काम आहे. 

जवळपास ९३ टी.एम.सी. पाणी उपसा सिंचन योजनांद्वारे गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी अंदाजे ३० ते ३५ हजार कोटी रुपये  निधीची आवश्यकता लागणार असल्याचा प्राथमिक अंदाज  आहे. महत्वाचे म्हणजे घाटमाथ्यावरील पाणी वळविणेचे काम हे जवळपास पूर्णतः  डोंगराळ भागात, जंगल व अभयारण्य मधून करावे लागणार असून त्यासाठी केंद्र सरकारची मंजूरी व मोठी आर्थिक मदत देखील आवश्यक असणार आहे.

जायकवाडी धरण 
एकूण क्षमता :- 102.73 टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा :-76.67 टीएमसी

दि. 16 ऑक्टोबर २०२३ रोजीचा पाणीसाठा.
१) एकूण:-६१.८५६१ टीएमसी (६०.२१%)
२) उपयुक्त:--३६.०८०३ टीएमसी (४७.०६%).
३) समन्यायी पाणी वाटप कायदा- 2005 नुसार 65 टक्के उपयुक्त साठा:-४९.८४ टीएमसी.
    कमी पडणारा उपयुक्त पाणीसाठा (शॉर्ट फॉल इन लाईव्ह स्टोरेज):-१३.७६ टीएमसी.
४) धरणातील आजपर्यंत झालेला एकूण पाणी वापर:--७.८४९६ टीएमसी.
५) नांदूर मध्यमेश्वर (गोदावरी नदी) बंधारा ओव्हर फ्लो:--१६.५०३ टीएमसी.
६) ओझर बंधारा (प्रवरा नदी- भंडारदरा व निळवंडे) ओव्हर फ्लो:--३.६०६ टीएमसी
७) धरणात झालेली एकूण पाणी आवक :-२४.३४९० टीएमसी
८) अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील गोदावरी धरण समूह व प्रवरा नदी धरण समूहांमधून संभाव्य सोडावे लागणारे पाणी अंदाजे :--११ टीएमसी.                      

(लेखक जलसंपत्ती अभ्यासक असून जलसंपदा विभागाचे से.नि.कार्यकारी अभियंता आहेत.)

Web Title: 11 to 13 TMC of water to be released for Jayakwadi from Nagar and Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.