नीरा उजवा कालवा कि.मी. ४९/९०० कोळकी (ता. फलटण) जाधववाडी (फ) येथील कालव्याच्या खालच्या बाजूस सुमारे १.२ मी. व्यासाची लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी पुढील १५ दिवसांचा अवधी लागणार आहे.
या गळती दुरुस्तीनंतर माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्यातील अर्धवट राहिलेले उन्हाळी आवर्तन सुरू करण्यासाठी कालवा सल्लागार समितीसमोर सदर विषय ठेवून पुढील कार्यवाही होईल, असे कार्यकारी अभियंता शिवाजी शिंदे यांनी सांगितले.
पंढरपूर, सांगोला, माळशिरस तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी वरदायिनी असलेल्या नीरा उजवा कालव्यातून उन्हाळी आवर्तन चालू होते. तर दुसरीकडे लाभक्षेत्रातील शेती पिके, फळबागा पाण्याला आल्या असताना उन्हाळी आवर्तन अचानक बंद झाले. यामुळे 'दुष्काळात तेरावा महिना' म्हणण्याची वेळ पंढरपूर, सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे.
दरम्यान पाटबंधारे कर्मचारी नीरा उजवा कालव्याच्या सर्व्हिस रोडने पेट्रोलिंग करीत असताना ५ मे रोजी फलटण तालुक्यातील कोळकी-जाधववाडी (फ) पाणीपुरवठा योजना टँक पॉइंट जवळ कि.मी. ४९/९०० सर्व्हिस रोडच्या खालील बाजूस कालव्यास घळ पडून बोगद्यातून मातीमिश्रित पाणी वाहत असल्याचे निदर्शनास आले.
त्यावेळी कर्मचाऱ्यांनी सदर गळतीची माहिती तत्काळ वरिष्ठांना कळविली. गळतीची गांभीर्याने दखल घेऊन अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार जाधव यांनी तेथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
पाणी बंद झाल्यानंतरच कामाला सुरुवात- नीरा उजवा कालव्यातून उन्हाळी आवर्तन चालू असल्यामुळे विसर्ग मोठा चालू होता. त्यामुळे दि. १० मेपासून धरणातून टप्प्या-टप्प्याने विसर्ग कमी करून दि. १२ मे रोजी विसर्ग अंशतः पूर्ण बंद केला.त्यामुळे सोमवार, दि. १३ मे रोजी कालव्यातील पाणी बंद होईल.- त्यानंतर प्रत्यक्ष गळतीच्या ठिकाणी कामाला सुरुवात होणार आहे. गळतीचे काम पूर्ण करण्यासाठी पुढील किमान १५ दिवसांचा कालावधी लागेल, असे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी सांगितले.
पिण्याच्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणारउन्हाळ्यामुळे शेतातील उभी पिके, फळबागा पाण्याअभावी सुकून चालल्या आहेत. जनावरांना व माणसांना पिण्याच्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तर नेमके माढा लोकसभेचे मतदान झाल्यानंतर नीरा उजवा कालव्यातून उन्हाळी आवर्तनाचे सोडलेले पाणी बंद केल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.