पुष्कर डांगरे
नागपूर जिल्ह्यातील उमरेड व भिवापूर तालुक्यातील जाेरदार पावसामुळे वेणा नदीवर वडगाव (रामा डॅम) आणि नांद नदीवरील शेडेश्वर (नांद) जलाशयात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे या दाेन्ही जलाशयातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे.
पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाने साेमवारी (दि. २२) सकाळी वडगाव जलाशयाचे १५ आणि नांद जलाशयाचे ७ गेट उघडले आहेत. ज्यामुळे वडगाव जलाशयातून ६३६.१५ क्युमेक आणि नांद जलाशयातून २९२.५० क्युमेक असा एकूण ९२८.६५ क्युसेक पाण्याचा विसर्ग हाेत आहे.
उमरेड तालुक्यातील या दाेन्ही जलाशयाच्या जलग्रहण क्षेत्रात चार दिवसांपासून जाेरदार पाऊस काेसळत आहे. वडगाव जलाशयाच्या कचमेंट एरियात साेमवारी सकाळी १२० मिमी तर आजवर ७२७ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली.
पाण्याची आवक वाढल्याने या जलाशयात ७१.०८ टक्के पाणीसाठा गाेळा झाला आहे. हा साठा धाेक्याच्या पातळीकडे वाटचाल करीत असल्याने पाटबंधारे विभागाने साेमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास या जलाशयाचे एकूण २१ पैकी १५ गेट प्रत्येकी ५० सेंटिमीटरने उघडले आहेत. या गेटमधून वेणा नदीच्या पात्रात ६३६.१५ क्युसेक पाण्याचा विसर्ग हाेत आहे.
नांद जलाशयाच्या जलग्रहण क्षेत्रात राेज सरासरी ५७ मिमी पाऊस काेसळत असून, या भागात आजवर ७६५ मिमी पाऊस काेसळल्याची नाेंद करण्यात आली आहे. त्यामुळे या जलाशयातील पाणीसाठा ३१ टक्क्यांवरून ५२ टक्क्यांवर पाेहाेचला आहे.
परिणामी, पाटबंधारे विभागाने साेमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास या जलाशयाचे ७ गेट प्रत्येकी ५० सेंटिमीटरने उघडले असून, यातून नांद नदीच्या पात्रात २९२.५० क्युसेक पाण्याचा विसर्ग हाेत आहे.
पिके पाण्याखाली
माेठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हाेत असल्याने वेणा आणि नांद नदीला पूर आला आहे. या दाेन्ही जलाशयांच्या खालच्या भागात दाेन्ही नद्यांच्या पुराचे पाणी पसरल्याने उमरेड तालुक्यातील या नद्या काठची शेकडाे एकरातील कपाशी, साेयाबीन, तूर, ऊस व इतर खरीप पिके पाण्याखाली आली आहेत. काही शिवारात पिकांसह शेती खरडून गेली आहेत. साेबतच वर्धा जिल्ह्यातील शेती व पिकांचे नुकसान झाले आहे.
गावांचा संपर्क तुटला
वेणा आणि नांद नदीला पूर आल्याने या दाेन्ही जलाशयाच्या खालच्या भागाला असलेल्या उमरेड तालुक्यातील सिंगोरी, कळमना (बेला) आणि सालई (बु) या गावांचा उमरेड शहर व इतर गावांशी संपर्क तुटला आहे. कारण, या गावांना जाेडणाऱ्या राेडसह पुलावरून माेठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत आहे. या दाेन्ही नद्यांना वर्धा जिल्ह्यातील कांडली येथे संगम हाेताे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटला आहे.
बालिकेचा उपचाराविना मृत्यू
सिंगाेरी (ता. उमरेड) येथील यामिनी शिवाजी लोंढे ही तीन वर्षीय मुलगी तापाने आजारी हाेती. गावालगतच्या नांद नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटला. त्यामुळे तिला उपचाराला नेणे शक्यच झाले नाही. उपचाराविना निरागस यामिनीचा मृत्यू झाला.
या भागातील बहुतांश पूल कमी उंचीचे असल्याने ही समस्या दरवर्षी उद्भवते. सरकार व प्रशासन आणखी किती लाेकांचा जीव घेणार आहे, असा प्रश्न उपस्थित करीत या भागातील पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी सिंगाेरीच्या सरपंच पूनम अवघडे यांनी केली आहे.