पिण्यासाठी आणि औद्योगिक वापर यासह रब्बी हंगामात शेतीला दोन आवर्तने देण्यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सोमवारी दिले.
गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहामध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवारी झाली. जलसंपदा कार्यकारी अभियंता समाधान सब्बीनवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, जालना उपजिल्हाधिकारी केशव नेटके, बीड उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी आदी प्रत्यक्ष, तर आ. राजेश टोपे हे ऑनलाइन उपस्थित होते.
फेब्रुवारी, मार्च महिन्यात पाणी सोडणार
जायकवाडी प्रकल्पाची सिंचन क्षमता १८ लाख ३ हजार ३२२ हेक्टर आहे. सद्य:स्थितीत तेथे ३२.६८७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी ६.५१६ टीएमसी पाणी औद्योगिक वापरासाठी राखीव असून, १५.५ टीएमसी पाणी रब्बी पिकांच्या आवर्तनासाठी वापरता येणार आहे. रब्बी पिकांसाठी पहिले आवर्तन फेब्रुवारी ते मार्च आणि दुसरे आवर्तन एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये देण्यात येणार आहे.
१४४ गावांत जाणार योजनांची माहिती...
लोककल्याणकारी योजनांच्या जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या चित्ररथास पालकमंत्री भुमरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. जिल्ह्यातील १४४ गावांत हा चित्ररथ जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पोहोचविणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने आदींची यावेळी उपस्थिती होती.
४२ गावांतील कामांचा आढावा...
पैठण तालुक्यातील ४२ गावांचा व विविध विकासकामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. कारोड, आडगाव खुर्द, एकोड, नायगाव, धारधोत, भालगाव, आपतगाव चितेगाव, चित्ते पिंपळगाव, पाचोड, डायगव्हाण, गारखेडा, घारेगाव, पिंपरी, कचनेर, खोडेगाव या गावांबरोबर इतरही गावांतील घरकुल, गोठा, पेव्हर ब्लॉक, वृक्ष लागवड, मातोश्री पाणंद रस्ता, रोपवाटिका, सिंचन विहीर, शाळेला संरक्षण भिंत, शेततळे, साठवण तलाव आदी कामांचा आढावा घेण्यात आला.