Join us

ढगफुटी झाली तर... नाशिक जिल्ह्यातील २५ गावांवर वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2023 2:43 PM

यंदा नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी जरी राहिले तरी ऑगस्टच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात वरील तालुक्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाशिक शहरासह जिल्ह्यात अद्याप या हंगामात मुसळधार पाऊस झाला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण तसे कमी राहिले आहे. मात्र, अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेत जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील सुमारे २५ पेक्षा जास्त गावांवर जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन शाखेचा 'वॉच' आहे. यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी जरी राहिले तरी ऑगस्टच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात वरील तालुक्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ढगफुटीसदृश पाऊस झाल्यास पूरस्थिती ओढावल्यास मदतीसाठी पथकेही तयार असून, साधनसामग्रीही सज्ज ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७६.५ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा पाऊस कमी आहे. नाशिकमधील पाच तालुक्यांचा भाग हा जास्त पर्जन्याचा आहे.

जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण या तालुक्यांमध्ये पर्जन्यमान अन्य तालुक्यांच्या तुलनेने जास्त असते. यामुळे या भागातील नद्या, नाले, ओहोळ दुथडी भरून पावसाळ्यात वाहतात. त्यामुळे फरशीपूल, लोखंडी पूल पाण्याखाली जाऊन गावांचा संपर्कही तुटतो, तसेच घाटमार्ग व डोंगराच्या परिसरात दरडी कोसळण्याच्याही घटना घडतात. मात्र, आतापर्यंत मुसळधार पाऊस झालेला नाही. यामुळे नद्यांनाही पूर आले नाही. 

मोठ्या पावसाचा चार तालुक्यांना धोकाऑगस्टमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस झाल्यास सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण, बान्हे, बोरगाव, मानखेड, पिंपळसोंड, साखळचोंड या गावांमध्ये जास्त पाऊस होऊ शकतो, तसेच पेठमधील जोगमोडी, कोहोरसह अन्य गावांना धोका होऊ शकतो. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वरमधील हरसूल, वेळुंजे, पहिने पेगलवाडी, अंजनेरी या भागात जास्त पाऊस होऊ शकतो.

या भागातील गावांवर जिल्हा प्रशासनाचा वॉच कायम आहे. या भागातील घरेसुद्धा कच्ची असल्यामुळे अनेकदा भिंती कोसळण्याच्याही घटना घडतात.५०० जणांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण १ नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून दोन महिन्यापूर्वीच ५०० जणांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पंधरा दिवसांच्या निवासी प्रशिक्षणात आपत्ती निवारणाचे धडे देण्यात आले आहेत. आपदा मित्र म्हणून प्रशिक्षित असलेल्या या युवकांची मदत जिल्हा आपत्ती शाखेला होत आहे. विविध तालुक्यांमधून तरुण, तरुणीनी हे प्रशिक्षण घेतले आहे.

टॅग्स :मोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाज