गेल्या कित्येक वर्षांपासून खडकवासलाधरणातील गाळ काढला नसल्याने साठवण क्षमता कमी झाली होती. आता २८ लाख ट्रक 'काळं सोनं' म्हणजे गाळ काढण्यात आला.
परिणामी धरणात ०.२० टीएमसी पाण्याचा साठा झाला आहे. दुसरीकडे धरणातील गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकल्याने तेथील पीकही जोमदार येत असून, उत्पन्नात वाढ होत आहे. हा दुहेरी फायदा झाला आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात कित्येक टन गाळ साठलेला आहे. धरण उभारल्यापासून गाळ काढला गेला नाही. त्यामुळे धरणाची पाणी साठविण्याची क्षमताही बरीच कमी झाली. खडकवासला धरणाची स्थापना १८७९ मध्ये करण्यात आली. तेव्हाची क्षमता ३.७५ टीएमसी होती.
हळूहळू गाळ साठत गेला आणि ही क्षमता १.७५ टीएमसीवर आली. धरण उभारले, त्यानंतर कधीही गाळ काढला नाही. पण, २०१३ पासून ग्रीन थंब या संस्थेच्या माध्यमातून गाळ काढला जात आहे. कर्नल (निवृत्त) सुरेश पाटील यांनी ही संस्था स्थापन केली आणि त्यांनी हा गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतला.
दरवर्षी हजारो टन गाळ काढला जात असून, तो आजूबाजूच्या शेतामध्ये शेतकऱ्यांना दिला जात आहे. कर्नल पाटील म्हणाले की, मी सैन्यातून निवृत्ती घेतल्यानंतर पर्यावरणासाठी काम करायचे ठरवले. त्यासाठी ग्रीन थंब ही संस्था सुरू केली. खडकवासला धरणातील गाळ काढण्यास सुरुवात केली.
यासाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी सुरुवातीला खूप कष्ट करावे लागले. सीएसआर निधी मिळत नव्हता. अखेर माझे घर त्यासाठी विकले आणि काम सुरू केले होते. गेल्या काही वर्षात सीएसआर निधी मिळत आहे. त्यातून आतापर्यंत २८ लाख टन गाळ काढला आहे.
अधिक वाचा : Ujani Dam 'उजनी' ३० जूनपर्यंत किती टीएमसीने घटणार