सांगली : जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून, दुष्काळी तालुक्यांसह सर्वत्र पाऊस पडत आहे. सोमवारी दुपारपासून शिराळा, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव आणि जत तालुक्यांतही जोरदार पाऊस सुरूच राहिला.
त्यामुळे ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत दिवसभरात तीन फुटांनी वाढ झाली. तासगाव तालुक्यातील अग्रणी, येरळा नदी दुसऱ्या दिवशीही ओसंडून वाहत होती.
आटपाडी, जत तालुक्यांत पावसाची संततधार सुरू झाली. अनेक भागांत रात्री पाऊस सुरूच होता. पावसाचे आगार असलेल्या शिराळ्यासह वाळवा, मिरज तालुक्यांत चांगला पाऊस होत आहे. कृष्णा आणि वारणेची पातळी तीन फुटांनी वाढली. सांगलीतील आयर्विन पुलाची पातळी सायंकाळी ११ फुटांवर होती.
सरासरी ९ मि. मी. पाऊस जिल्ह्यात सरासरी ९ मि. मी. पाऊस झाला असून, कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक ३१.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय मिरज तालुका ७ मि. मी., जत २४, खानापूर ३.८, वाळवा १, तासगाव ६.८, शिराळा २.१, आटपाडी ८.८, पलूस आणि कडेगाव तालुक्यांत प्रत्येकी १ मि. मी. पाऊस झाला.
आटपाडी तालुक्यात दमदार पाऊसआटपाडी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली. रविवारी झालेल्या दमदार पावसाने गोमेवाडी-लक्ष्मीनगरमार्गे करगणी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खटकाळी ओढ्यावरील पुलाचा एक भाग वाहून गेला.
परिणामी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. मात्र या मार्गावरील वाहतूक बंद न केल्याने पूल धोकादायक बनला आहे. दुष्काळी पट्टयातील आटपाडी तालुक्यामध्ये मान्सूनच्या सुरुवातीसच पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यातील पूर्व, पश्चिम भागास पावसाने झोडपून काढले. शेटफळे, माळेवाडी येथील ओड्यावर असणारे बंधारे भरून पाणी वाहत आहे. शेटफळे येथील दोन्ही कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा वाढला आहे.
अधिक वाचा: Mug Variety मुगाच्या या सुधारीत वाणांची निवड करा आणि भरघोस उत्पादन मिळवा