Join us

कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ बंधारे पाण्याखाली.. जाणून घ्या प्रमुख धरणांची पाणीपातळी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 11:42 AM

सायंकाळी पाचपर्यंत पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर २८ फूट ८ इंच पाण्याची पातळी राहिली. आज, बुधवारी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर कमी राहिला. मात्र तळकोकण आणि धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने जिल्ह्यातील ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

सायंकाळी पाचपर्यंत पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर २८ फूट ८ इंच पाण्याची पातळी राहिली. आज, बुधवारी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गेल्या चार, पाच दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पन्हाळा, शाहूवाडी, आजरा, चंदगड या डोंगराळ तालुक्यात पावसाची संततधार राहिली. यामुळे नदी, नाल्यातील पाणी पातळीत वाढ झाली.

पंचगंगा नदीतील पाणी पात्राबाहेर पडले. पण सोमवारपासून पावसाचा दिवसभरही पावसाचे प्रमाण कमी राहिले. काही वेळ उन आणि इतर वेळी तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी राहिल्या. परिणामी पंचगंगा नदीतील पाणी पातळीत घट होत आहे.

मंगळवारी सकाळी १० वाजता राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी २९ फूट ९ इंच होती. दुपारी दोनपर्यंत ९ इंचानी कमी झाली. दुपारी ३ वाजता २८ फूट १० इंच पाणी पातळी राहिली. सायंकाळी पाचपर्यंत २८ फूट ८ इंच राहिली. दिवसभर पाणी पातळी घटत राहिली. राधानगरी धरणात ४.६९ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातून १,४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी, वेदगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, दुधगंगा नदीवरील दत्तवाड, कासारी नदीवरील येवलूज पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, वालोली, बाजार भोगाव, वारणा नदीवरील चिंचोली, तांदूळवाडी, कोडोली व खोची, भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, कुंभी नदीवरील शेनवडे, मांडुकली व कळे असे ३१ बंधारे पाण्याखाली आहेत.

६५ हजार क्सुसेकपर्यंत विसर्ग वाढवणारअलमट्टी धरणातील आवक वाढत आहे. ४० हजार वरून ६५ हजार क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दिली.

जनावरांसाठी छावण्या सुरु करण्याचे नियोजनमहापूर आल्यास बाधित गावातील जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवून चारा छावण्या सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यासाठी विस्थापित जनावरांना चारा, पशुखाद्य, पाणी पुरवण्यासाठी दरपत्रक देण्याचे आवाहन केले आहे.

धरणातील पाणीसाठा (टीएमसी)राधानगरी ४.६९तुळशी १.९५वारणा २०.६१दूधगंगा १०.९२कासारी १.६९कडवी १.९०कुंभी १.३४पाटगाव २.७०चिकोत्रा ०.६५चित्री १.३०जंगमहट्टी १.१२घटप्रभा १.५६जांबरे ०.८२आंबेआहोळ १.४सर्फनाला ०.२८कोदे प्रकल्प ०.२१

टॅग्स :कोल्हापूरधरणकोल्हापूर पूरपाऊसराधानगरीनदीपाणी