पुणे : सध्या राज्यभरात उन्हाचा चटका वाढताना दिसत असून राज्यातील येणाऱ्या पाच दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून ९ एप्रिलपर्यंतच्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत येणाऱ्या चार दिवसांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही भागांत वातावरण कोरडे राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
येणाऱ्या पाच दिवसांत कोकणात वातावरण कोरडे राहण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात येणाऱ्या २४ तासांत वातावरण कोरडे राहणार असून त्यानंतर ६ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गारपिटीची शक्यता कुठे?दरम्यान, जळगाव, हिंगोली, वाशिम, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांनी कशी घ्यावी काळजी?सध्या राज्यातील रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. तर अनेक शेतकऱ्यांचा गहू आणि उन्हाळी बाजरी काढणीला आलेली आहे. अशा शेतकऱ्यांना या अवकाळीचा आणि गारपिटीचा फटका बसण्याची शक्यता असून फळबागांचे मोठे नुकसान होऊ शकते. राज्यातील गारपीट आणि अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेकऱ्यांनी आपल्या शेतातील माल सुरक्षित ठेवण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.