Join us

औरंगाबाद विभागात मागील ८५ दिवसांपैकी ५२ दिवस कोरडेच! 

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 25, 2023 6:04 PM

पुढील दोन आठवडे पाऊस नाही. शेतकऱ्यांनी करावे पीक नियोजन

औरंगाबाद विभागात मागील 85 दिवसात तब्बल 52 दिवस कोरडेच गेल्या आहेत. १ जून २०२३ ते 24 ऑगस्ट 2023 या कालावधीत केवळ 33 दिवस पाऊस पडल्याचे महसूल विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. 

आज औरंगाबाद जिल्ह्यात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या पर्जन्यमान, पाणीसाठा, व कृषी अवस्थेची आढावा बैठक पार पडली. 

औरंगाबाद जिल्ह्यात जूनच्या 30 दिवसांमधील 23 दिवस कोरडे गेले असून केवळ सात दिवस पाऊस होता. तर जुलै महिन्यात 31 दिवसांपैकी बारा दिवस कोरडे गेले असून 19 दिवस पर्जन्यमान चांगले होते. तर ऑगस्ट महिन्यात कालपर्यंत म्हणजेच 24 दिवसांपैकी केवळ तीन दिवस पाऊस पडला असून 21 दिवस कोरडेच गेल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.

औरंगाबाद जिल्ह्यात पुढील दोन आठवडे पाऊस नसल्याचे कृषी विभाग केंद्रातील हवामान विषयक शास्त्रज्ञ शिवा काजळे सांगतात. 

"पुढील दोन आठवडे तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस पडू शकतो. पैठण तालुक्याला पुढील 16 दिवस पावसाची शक्यताच नाही. एखाद्या ठिकाणी पडला तर भुरभुर पाऊस असेल. ७ ते ८ एम.एम पाऊस पडू शकतो. पैठण तालुका सोडल्यास बाकी ठिकाणी थोडाफार पाऊस झाल्याने मातीत ओलावा शिल्लक आहे. त्यामुळे दोन आठवडे जरी पाऊस नसला तरी पावसाचा ताण पिकांना सहन होईल. 

कृषी विज्ञान केंद्रांच्या हवामान अंदाजासाठी २.५ दिवसांच्या वर पाऊस झाला तर पावसाचा एक दिवस गणला जातो. कृषी विभागातील आकडेवारी वेगळ्या पद्धतीची असून प्रत्यक्षात झालेले पर्जन्यमान हे खूपच कमी असल्याचे ते म्हणाले. दोन आठवडे पावसाची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी संरक्षित सिंचनाने पाणी द्यावे. येणाऱ्या काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसत असून आत्तापासून शेतकऱ्यांनी नियोजन करावे असे आवाहन हवामान अभ्यासक शिवा काजळे यांनी केले.

सर्वात कमी पर्जन्यमान बीड जिल्ह्यात

जून ते ऑगस्टच्या 24 तारखेपर्यंत औरंगाबाद विभागातील नांदेड जिल्ह्यात 36 दिवस पाऊस होता. तर सर्वात कमी पर्जन्यमान बीड जिल्ह्यात झाल्याचे समोर येत आहे. जून महिन्यात बीड जिल्ह्यामध्ये 10 दिवस पावसाचा खंड पडला. जुलैमध्ये 12 दिवस तर ऑगस्ट महिन्यात 18 तारखेपर्यंत वीस दिवस पावसाचा खंड पडला आहे. मागील 85 दिवसांमध्ये जून आणि जुलै महिन्यात पर्जन्यमान चांगले झाले असले तरी ऑगस्ट महिन्यात 24 पैकी वीस दिवस कोरडेच गेल्याचे चित्र असून शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :हवामानशेतकरीमोसमी पाऊसपाऊसधनंजय मुंडेपीककृषी विज्ञान केंद्र