अहिल्यानगर : पुढील पुढील तीन ते चार वर्षात पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आला आहे.
या प्रकल्पातून सुमारे ५२ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठबळाने युध्दपातळीवर काम हाती घेतले आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
कुकडी व घोड कालवा सल्लागार समितीची बैठक मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच अहिल्यानगरमध्ये झाली. यानंतर आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.
बैठकीसाठी आमदार काशिनाथ दाते, ज्ञानेश्वर कटके, शरद सोनवणे, नारायण पाटील, विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, कृष्णा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, गोदावरी खोऱ्यातील पाणीवाटपासाठी समन्यायी जायकवाडी प्रकल्पात ६५ टक्के जलसाठ्याची अट मेंढेगिरी समितीने निश्चित केली होती. ती आता सात टक्क्यांनी घटवून ५८ टक्के शिफारस केली असल्याचे वृत्त आहे. मात्र ही समिती मी जलसंपदा खात्याचा पदभार घेण्यापूर्वी कार्यरत आहे.
यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेणार असून आढावा घेतला जाईल. मात्र मराठवाड्यावर अन्याय करण्याची शासनाची कुठलीच भुमिका नाही. समन्यायी पाणी वाटपावरून नगर-नाशिक विरुध्द मराठवाडा वादावर मार्ग निघेल असेही ते म्हणाले.
मुळ धरणातील गाळ काढून त्याची उंची वाढविण्यासंदर्भात स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना दिला आहे. राज्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.
त्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. गाळ काढण्यासंदर्भात याआधी काही निर्णय झाले आहे का? त्याची लवकरच माहिती घेऊ असेही विखे पाटील म्हणाले.
कुकडी-घोडमधून दुसरे आवर्तन फेब्रुवारीत
- कुकडी धरणातून सध्या रब्बी हंगामासाठीचे आवर्तन १४ जानेवारीपर्यंत सुरू राहिले.
- दुसरे आवर्तन पुढील महिन्यात देण्यात येईल. त्यानंतरच्या आवर्तनाबाबत पुन्हा कालवा समितीची बैठक घेतली जाईल.
- तसेच घोड धरणातून एकुण चार आवर्तन देण्यात येणार आहे, कालवा सल्लागार समिती बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
- शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळेल असे सूक्ष्म नियोजन पाटबंधारे विभागाने करावे. पीक पाहणी नुसार नियोजन करावे.
- प्रत्यक्षात पिकांचा प्रकार आणि गरज लक्षात घेऊन पाणी द्यावे.
- पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात, अशा सुचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत
अधिक वाचा: Lokari Mava : उसावरील लोकरी मावा नियंत्रणासाठी करा हे सोपे जैविक उपाय