सतीश सांगळेकळस: खडकवासला धरण साखळीतील प्रकल्पात सध्या १६ टीएमसी पाणीसाठा असल्याने पुणे शहराच्या पाणी मागणीत कोणतीही कपात न करता जिल्ह्यातील हवेली, दौंड, बारामती व इंदापूर तालुक्यातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीतून उन्हाळी हंगामासाठी केवळ एकच आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे ६० हजार हेक्टरवरील शेतीसिंचन व पाणीयोजना अडचणीत येणार आहेत.
प्रकल्पात सध्या १६ टीएमसी म्हणजेच ५५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने ग्रामीण भागातून शेतीच्या सिंचनासाठी उन्हाळी दोन आवर्तनाची मागणी होती, मात्र कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केवळ एकच आवर्तन ४ मार्चपासून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परिस्थिती पाहून दुसरे आवर्तनाचा निर्णय घेऊ, असे आश्वासन देण्यात आले त्यामुळे या भागाला मोठा फटका बसणार आहे.
पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. यात पाणीवाटपाबाबत निर्णय घेण्यात आला. खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत वरसगाव, टेमघर या चार धरणांमध्ये यंदाच्या वर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी पाणीसाठा उपलब्ध असल्याने हा निर्णय घेण्यात आला, मात्र पुणे शहरातील पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात करण्यात आली नाही.
गेल्या वर्षी पुणे शहराला १ मार्च ते १५ जुलैअखेर सुमारे ७ टीएमसी पाणी दिले होते. त्यामुळे दोन आवर्तन देणे आवश्यक होते. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरासाठी सावध भूमिका घेतली आहे मात्र बारामती लोकसभा मतदारसंघातील या चार तालुक्याचे शेतीचे नुकसान होणार आहे.
वाढत्या पाणी मागणीमुळे या भागातील फळबागा व शेती अडचणीत आली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात आवर्तन देण्यास टाळाटाळ केली जाते महत्त्वाच्या या पाणीप्रश्नी कायम सापत्नभावाची वागणूक ग्रामीण भागाला देण्यात येते.
खडकवासला कालव्याचा पट्टा हा अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या पट्ट्यात इतर भागाच्या तुलनेत पर्जन्यमान कमी असते. यामुळे या भागाला खडकवासला कालव्याचा मोठा आधार आहे. मात्र कालव्याला पाणी कधीच वेळेवर येत नसल्याने या भागातील शेतकरी संतप्त आहे.
कालव्यावरील शेती बरोबरच जानाई व सिरसाई उपसा सिंचन प्रकल्प, तसेच दौंड व इंदापूर शहराचा पाणीपुरवठा व शेकडो ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना धोक्यात येणार आहेत भीमा पाटस, कर्मयोगी इंदापूर, अनुराज यवत, दौंड शुगर, बारामती अॅग्रो, छत्रपती भवानीनगर, या साखर कारखाना पट्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
दुसरे आवर्तन दौंडसाठीखडकवासला प्रकल्पात १६.१७ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. सिंचन व बिगरसिंचनासाठी १४.९८ टीएमसी उपलब्ध होत आहे. त्यातून सिंचनासाठी ६.९८ टीएमसी पाणी उपलब्ध होत असून ४ मार्चपासून पहिले आवर्तन सिंचनासाठीचे आहे. हे आवर्तन ४५ दिवसांचे असून दुसरे आवर्तन हे दौंड नगरपालिका आणि इतर पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी दोन आवर्तनेगेल्या वर्षी उन्हाळी हंगामात दोन आवर्तन देण्यात आली होती, उन्हाळ्यात पहिले आवर्तन १ मार्चपासून देण्यात आले होते दुसरे उन्हाळी आवर्तन १ मे पासून सुरू करून हे आवर्तन सुमारे ४५ दिवस म्हणजे १५ जून पर्यंत देण्यात आले होते. दोन्ही आवर्तने सिंचनासाठी देण्यात आली होती, अशी माहिती खडकवासला प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता शंकर बनकर यांनी दिली.