जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळला. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असल्याने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सायंकाळपर्यंत पंचगंगेने ३४.४ फुटांवरून वाहत इशारा पातळी (३९ फूट) कडे आगेकूच सुरू केली आहे.
तब्बल ७४ बंधारे पाण्याखाली गेल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील चार धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, प्रमुख राधानगरी ६८, 'वारणा' ६६, तर दूधगंगा ५२ टक्के भरले आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला असून, जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गुरुवारपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर जोरदार पाऊस कोसळत राहिला. शुक्रवारी सकाळपासून त्यात वाढ होत गेली असून, दिवसभर एकसारखा पाऊस कोसळत असल्याने नदी, ओबंधांचे पाणी झपाट्याने वाढत आहे. गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड व शाहूवाडी तालुक्यांत धुवाधार पाऊस सुरू आहे.
धरणक्षेत्रातही पाऊस कोसळत असल्याने 'राधानगरी'तून प्रतिसेकंद १४००, 'वारणा'तून १५४६, 'कासारी'तून ५५०, 'कुंभी'तून ३०० 'घटप्रभा'तून ६९५२ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुराचे पाणी झपाट्याने वाढत आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात तब्ब्बल पाच फुटांनी वाढली असून ३४ फुटांवरून पाणी वाहत आहे.
पंचगंगा इशारा पातळीकडे (३९ फूट) आगेकूच करू लागली आहे. विविध नद्यांवरील ७४ बंधारे पाण्याखाली गेल्याने मार्गावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आगामी २४ तासांत हवामान विभागाने कोल्हापूरसाठी रेड अलर्ट दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
धरणांतील पाणीसाठा (टक्केवारीमध्ये)जंगमहट्टी - १००घटप्रभा - १००जांबरे - १००कोदे - १००आंबेओहोळ - ९०पाटगाव - ८०कासारी - ७१राधानगरी - ६८वारणा - ६६तुळशी - ६३सर्फनाला - ६०कुंभी - ५८दूधगंगा - ५२चिकोत्रा - ५०