Join us

देशात यंदा ९४.४% पाऊस : भारतीय हवामान विभाग

By मुक्ता सरदेशमुख | Published: October 01, 2023 6:00 PM

अपेक्षित अंदाजाच्या ४% पाऊस तुट

देशभरात यंदा मान्सून हंगामात 94 टक्के पाऊस झाला असून अपेक्षित अंदाजानुसार या वर्षी ४% पाऊस तुट असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले. नैऋत्य मोसमी पावसाचा या हंगामातील अहवाल हवामान विभागाने प्रसिद्ध केला आहे. 

नैऋत्य मोसमी मान्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबर या कालावधीत देशातील एकूण कृषी क्षेत्राच्या सरासरी 101% पाऊस झाला आहे. सर्वसाधारणपणे या कालावधीत असणारा पाऊस 94 ते 106% अपेक्षित असतो. भारतात एकूण 868.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भारतात सरासरी 96 टक्के पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्यानंतर यंदा पावसाची ४ % तुट असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले. 

पावसाची तूट कशामुळे?

यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान देशभरातील पाऊस हा सरासरी 94% होता. हा पाऊस 2018 नंतरचा सर्वात कमी असून अल निनोच्या प्रभावामुळे व हिंदी महासागरातील सक्रिय ध्रुवीतेमुळे भारतातील मान्सून हंगामात पावसाची तूट आहे. यामध्ये जून (९१%) आणि ऑगस्ट (६४%) महिन्यातील पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहिला. ऑगस्ट महिना तर शतकातील सर्वात कोरडा महिना ठरला. 

यंदा नैऋत्य मोसमी पावसाने  बंगालच्या उपसागरात पश्चिमी वाऱ्यांसह हजेरी लावली व 30 मे रोजी अंदमान -निकोबार बेटांवर सुरू झालेला मान्सूनचा प्रवास केरळात 8 जून रोजी दाखल झाला. त्यानंतर अरबी समुद्र, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, गोवा, कोकण मधील बहुतांश भागात 19 जून पर्यंत पाऊस दाखल झाला. 8 जुलै पर्यंत नैऋत्य मौसमी पाऊस देशभरात सुरू झाला होता. महाराष्ट्रात जुलैचे दहा ते पंधरा दिवस पाऊस झाल्यानंतर पावसाचा जोर ओसरला व तब्बल दीड महिना पावसाचा खंड झाला. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळे देशात पुन्हा एकदा नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला. 

जून ते सप्टेंबर या चार महिन्यात भारतात किती टक्के झाला पाऊस?

महिना         

महिना सरासरी पाऊस प्रत्यक्ष पाऊस   टक्केवारी
जून165.4 mm151.1 mm91%
जुलै280.5 mm315.9mm113%
ऑगस्ट254.9mm162.71 mm64%
सप्टेंबर167.9 mm352.7mm113%

ऑक्टोबर महिन्यात देशातील बहुतांश भागात सरासरी होऊन कमी पावसाचा अंदाज आहे. तसेच कमाल व किमान तापमान ही सरासरीपेक्षा अधिक राहील असे हवामान विभागाने वर्तवले आहे. 

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात निम्म्या शेतजमिनींमध्ये सिंचनाचा अभाव असल्याने शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून राहावे लागते. देशात पिकांना पाणी देण्यासाठी व जलसाठे भरण्यासाठी तसेच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी मान्सूनचा पाऊस महत्त्वाचा ठरतो.

टॅग्स :पाऊसपाणीशेतकरीपाटबंधारे प्रकल्पहवामान