Join us

हवामान बदल आणि कृषी संशोधनाची गरज यावर मराठवाडा कृषी विद्यापीठात होणार विचार मंथन

By बिभिषण बागल | Published: August 07, 2023 6:18 PM

कधी-अधिक पर्यन्‍य, पावसातील खंड, वाढणारे तापमान, अतिवृष्‍टी तर कधी दुष्‍काळ आदी परिस्थितीत शाश्‍वत उत्‍पादन देणारे वाण, तंत्रज्ञान निर्मिती करण्‍याची गरज आहे.

हवामान बदलाचा मोठा परिणाम शेती क्षेत्रावर होत असुन शाश्‍वत शेतीकरीता संशोधनात भर द्यावा लागेल. कधी-अधिक पर्यन्‍य, पावसातील खंड, वाढणारे तापमान, अतिवृष्‍टी तर कधी दुष्‍काळ आदी परिस्थितीत शाश्‍वत उत्‍पादन देणारे वाण, तंत्रज्ञान निर्मिती करण्‍याची गरज आहे. शेतीत जास्‍तीत जास्‍त रासायनिक खते, निविष्‍ठांचा वापर करून जास्‍तीत जास्‍त उत्‍पादन घेण्‍यापेक्षा निविष्‍ठांचा कार्यक्षम वापर करून शाश्‍वत उत्‍पादन प्राप्‍त करणे हे आपले लक्ष असले पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात भारत सरकाराच्‍या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग पुरस्‍कृत ‘हवामान बदलाच्‍या पार्श्‍वभुमी शाश्‍वत शेती करिता संशोधनाच्‍या बाबी’ याविषयावर दोन दिवसीय विचारमंथन कार्यशाळेचे आयोजन दिनांक ७ व ८ ऑगस्‍ट रोजी करण्‍यात आले असुन दिनांक ७ ऑगस्‍ट रोजी कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

व्‍यासपीठावर जुनागढ कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. ए. आर. पाठक, डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. व्‍ही. एम मायंदे, माजी कुलगुरू मा. डॉ. के. पी. गोरे, आयएआरआयच्‍या कृषि अभियांत्रिकी विभागाचे माजी प्रमुख डॉ. जे. एस. पन्‍वार, सहाय्यक महासंचालक डॉ. जिंदेन्‍द्र कुमार, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे शास्‍त्रज्ञ डॉ. अखिलेश मिश्रा, आयआयटी खरगपुर चे माजी प्राध्‍यापक डॉ. के. एन. तिवारी, डॉ. आर. डि. राय, डॉ. सय्यद ईस्‍माईल, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, आयोजन सचिव डॉ. यु. एन. खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

माजी कुलगुरू मा. डॉ. ए. आर. पाठक म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाचे तुर, ज्‍चारी पिकांचे चांगले वाण महाराष्‍ट्राबाहेर अनेक राज्‍यात प्रचलित आहेत. जागतिक पातळीवर भारत अन्‍नधान्‍य, दुध, फळ पिके इत्‍यादीच्‍या उत्‍पादनात आघाडीवर आहे, परंतु जीवनशैली व पौष्टिक अन्‍नाच्‍या कमतरतामुळे अनेक व्‍याधीस मानवास सामोरे जावे लागत आहे. शेती क्षेत्रातुन मोठ्या प्रमाणात हरित वायुचे उत्‍सर्जन होत असुन याचे प्रमाण कमी करण्‍याकरिता संशोधनावर भर द्यावा लागेल.   

माजी कुलगुरू मा. डॉ. व्‍ही. एम. मायंदे म्‍हणाले की, मानवाचे आरोग्‍य हे आहारावर आधारीत असुन आहार हे पौष्टिक अन्‍नधान्‍य उपलब्‍धतेवर उपलब्‍ध आहे, त्‍यामुळे शेती क्षेत्र अत्‍यंत महत्‍वाचे आहे. अन्‍न सुरक्षासह स्‍वास्‍थवर्धक अन्‍न सुरक्षावर भर द्यावा लागेल. माजी कुलगुरू मा. डॉ. के. पी. गोरे म्‍हणाले की, दिवसेंदिवस माती व पाणी यांचा ऱ्हास होत असुन मृदा संवर्धन व जल संवर्धन यावर संशोधनात प्राधान्‍य द्यावा लागेल.

शास्‍त्रज्ञ डॉ. अखिलेश मिश्रा यांनी भारत सरकारच्‍या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग देशातील दर्जेदार संशोधनाकरिता निधी उपलब्‍ध केला जातो, त्‍याकरिता चांगल्‍या संशोधन प्रस्‍ताव तयार करून सादर करण्‍याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात आयोजन सचिव डॉ. उदय खोडके कार्यशाळेच्‍या आयोजनाची माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ. सुनिता पवार व प्रा. प्रितम भुतडा यांनी केले तर आभार डॉ. सय्यद ईस्‍माईल यांनी मानले. दोन दिवस चालणाऱ्या कार्यशाळेत देशातील विविध नामांकित संशोधन संस्‍थेतील तज्ञ मार्गदर्शन करणार असुन हवामान बदलांच्‍या पार्श्‍वभुमीवर कोणत्‍या बाबींवर कृषि संशोधनाची गरज आहे, यावर विचारमंथन होणार आहे.

कार्यशाळेतील विचारमंथनाव्‍दारे विद्यापीठाच्‍या संशोधनाची दिशा निश्चित करण्‍यास मदत होणार असुन शास्‍त्रज्ञांना संशोधन विषय निश्चित करण्‍याकरिता मार्गदर्शक ठरणार आहे. संशोधन प्रकल्‍प तयार करून विविध निधी देणाऱ्या शासकीय व खाजगी संस्‍थेकडुन निधी प्राप्‍त करणे, शासकिय संस्‍था, खाजगी कंपन्‍या, शैक्षणिक संस्‍था आदींच्‍या एकत्रित सहभागातुन संशोधन याबाबत मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. कार्यशाळेत परभणीसह राहुरी, अकोला, दापोली कृषी विद्यापीठातील कृषि शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक, परिसरातील प्रगतशील शेतकरी, शेती क्षेत्राशी निगडीत खाजगी कंपन्‍यातील अधिकारी सहभागी झाले आहेत. 

टॅग्स :हवामानपाऊसशेतकरीशेतीपीकखरीपविद्यापीठपरभणी