रविंद्र शिऊरकर
रविवारी रात्रीपासून कोसळलेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांची नासाडी केली असून बॉम्ब सदृश्य आवाजाने नागरिकांत भिती निर्माण करत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रविवारी जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, कन्नड, गंगापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड भागात काही ठिकाणी जोराचा तर काही भागात हलक्या स्वरूपाचा रविवारी (दि.२६) रात्री पाऊस झाला.
रब्बी पिकांना विहरीतील जेमतेम पाणी पुरेल की नाही या भितीने लवकर लागवड केल्या गेलेल्या रब्बी ज्वारी तसेच मका आदी पिके ३-५ फूट उंचीचे शेतात बघावयास मिळत होते. मात्र या अवकाळी पावसाने व जोराच्या वाऱ्याने ही पिके पूर्णपणे जमिनीदोस्त झाली आहेत.
अवकाळीने पुर्नलागवडीचे संकट
हातातोंडाशी आलेल्या लाल कांद्याचे मात्र पूर्णपणे नुकसान या पावसाने झाले आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी म्हणून केलेल्या या ज्वारी, मका पिक लागवडीची सध्याची अवस्था बघता शेतकऱ्यांसमोर आस्मानी संकट उभे राहिले असून आता पुन्हा नव्याने शेत कसून लागवड करावी लागणार आहे.
झाडे उन्मळून पडली
अवकाळी पावसासोबत जोराचा वारा असल्याने विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून तसेच अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. कोरडवाहू शेतकरी मात्र या पावसाने समाधानी झाल्याचे दिसून येत आहे.
माझी एक एकर मक्का ४ फूट पेक्षा जास्ती वाढलेली होती. रात्री झालेल्या पावसाने मात्र आता पूर्णपणे आडवी पडली आहे. लागवड, बियाणे, खतांचा पूर्ण खर्च वाया गेला असून आता हे शेत पुन्हा नव्याने तयार करावे लागणार आहे.
- अभिषेक झाल्टे, शेतकरी शिऊर ता. वैजापूर
विहरीत पाणी नसल्याने आमच्या भागात बरेच शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. या पावसाने आता रब्बी हरभरा, ज्वारीचे बाटुक किंवा अजून एखादा पाऊस पुढे मागे झाला तर ज्वारी देखील हाती येईल. ज्यामुळे हा पाऊस काही ठिकाणी नुकसानीचा झाला असला तरी आमच्यासाठी फायद्याचा ठरला आहे.
- एकनाथ डोंगरे, शेतकरी लासुर स्टेशन