नवी दिल्ली : यंदा देशभरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरणांच्यापाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. पावसामुळे धरणांमधीलपाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ टक्के अधिक असल्याचे केंद्रीय जल आयोगाच्या ताज्या अहवालात म्हटले आहे.
१५० प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा १२४.०१६ अब्ज घनमीटर (बीसीएम) असून, तो एकूण क्षमतेच्या ६९% आहे. मागील वर्षी हा पाणीसाठा १११.८५ बीसीएम होता. उत्तर विभागाच्या धरणातील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या ५१ टक्के आहे, हे प्रमाण गेल्या वर्षीच्या ८८ टक्क्यांच्या तुलनेत कमी आहे.
याउलट, पूर्वेकडील भागात जलसाठा ५३% असून, तो गेल्या वर्षाच्या ३८ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. पूर्वेकडील प्रदेशात आसाम, झारखंड, ओडिशा, प. बंगाल, त्रिपुरा, नागालँड आणि बिहार यांचा समावेश होतो.
महाराष्ट्रात काय?
गुजरात आणि महाराष्ट्रासह पश्चिम विभागातील धरणसाठ्यांमध्येही सकारात्मक वाढ नोंदवण्यात आली आहे. येथे एकूण क्षमतेच्या ७२ टक्के धरणे भरली आहेत. गेल्या वर्षी धरणांमध्ये ६८% साठा होता.
७२% पाणीसाठा उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील धरणांत आहे.
कुठे पाणी कमी?
आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू येथे आकडेवारी वेगळी आहे. या क्षेत्रातील धरणे ७९ टक्केपर्यंत भरली आहेत.
गेल्या वर्षी हे प्रमाण ५३ टक्के होते. राजस्थान आणि हिमाचल प्रदेश सारख्या काही राज्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत कमी जलसाठा नोंदविण्यात आला आहे.