अहमदनगर : "शेडमधील कोंबड्या वाऱ्याच्या आवाजामुळे अटॅक येऊन मृत्यू पावल्यात. चाळीतील २० टन कांदा वाया गेलाय. याच कांद्यावर पुढचं शेतीचं नियोजन केलं होतं पण आता पर्याय राहिला नाही. घरात सगळे एकमेकांच्या तोंडाकडं बघतायेत." काळजात कालवाकालव करणारे हे वाक्य आहेत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भरत ढवळे या शेतकऱ्याचे. आज दुपारनंतर महाराष्ट्रातील विविध भागांत गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वच पीके वाया गेली आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील आणि साठवून ठेवलेला कांद्याचा अक्षरश: चिखल झाला आहे. पोल्ट्री फार्ममधील अनेक कोंबड्या गाराच्या आवाजामुळे आणि पाण्यामुळे अटॅक येऊन मृत्यू पावल्यात. तर रब्बीच्या हंगामात जे जे पीक शेतात उभं आहे ते पीक पूर्णपणे वाया गेलं आहे. आजच्या पावसामध्ये पडलेल्या गारा जवळपास एका टेनिस बॉलच्या आकाराच्या होत्या असं पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सांगितलं.
दरम्यान, गारामुळे फळपीकांचा पाला पूर्णपणे झडला आहे. ज्वारी आणि उसाचे पीकही वाऱ्यामुळे आडवे झाले असून टोमॅटो, कांदा यांसारखे भाजीपाला पीके उध्वस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे उडून जाणे, शेडवर झाड कोसळणे असा घटना घडल्या आहेत. पारनेर परिसरात ओढ्यांना आणि नाल्यांना अक्षरश: पूर आला आहे. तर खरीपानंतर रब्बीच्या हंगामात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
कांद्याचे मोठे नुकसान
निघोज परिसरात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. तर अनेक शेतकऱ्यांना आपापल्या चाळीमध्ये २० ते ३० टन कांदा सुरक्षित ठेवला होता पण अवकाळी पावसामुळे या कांद्यामध्ये पाणी जाऊन जवळपास ७० टक्के कांदा वाया गेला आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी लागवड केलेल्या कांद्याचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. तर लागवडीसाठी तयार असलेल्या कांद्याचे रोपही वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे.
द्राक्षे उत्पादक शेतकरी उध्वस्त
द्राक्षाचे मणी मोठे होत असतानाच अवकाळी पावसाने घाला घातला आणि शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतलाय. गारांच्या पावसामुळे बागांचा पाला पूर्णपणे झडला असून बागा पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत.
विजांच्या आवाजामुळे आणि वाऱ्यामुळे शेडचे पडदे फाटले आणि पोल्ट्री फार्ममध्ये पाणी गेलं. जोराच्या वाऱ्यामुळे पोल्ट्री फार्ममध्ये असलेल्या १०० पक्षांचा अटॅक येऊन मृत झाला. तर कांद्याच्या चाळीवर झाड पडल्यामुळे आख्खे पत्रे फाटले आहेत. चाळीमध्ये २० टन माल होता, त्यापैकी ६० ते ७० टक्के माल पावसामुळे वाया गेला आहे. याच कांद्यावर मी पुढचं शेतीचं आणि इतर नियोजन केलं होतं. कांद्याचे पैसे येतील या आशेने आम्ही दिवाळीला ट्रॅक्टरही घेतला होता. पण अवकाळीने सगळं नुकसान झालंय. घरामध्ये सगळं वातावरण शांत आहे. सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघतायेत.- भरत ढवळे, (शेतकरी, निघोज,ता. पारनेर)
अचानक पाऊस सुरू झाला, शेतात एक फुटाचा गारांचा थर होता. माझ्या एक एकर शेतातील लागवडीला आलेलं सगळं कांद्याचं रोप वाया गेलंय, चाळीतले ३०० पोती म्हणजे १५ टन कांदे विक्रीसाठी भरून ठेवले होते. पावसाने भिजल्यामुळे तो सगळा माल वाया गेलाय. चाळीत राहिलेला २० ते २५ टन कांदाही भिजल्यामुळे वाया गेलाय. आम्ही कांद्याच्या पोत्यावर ताडपत्री झाकायला गेलो होतो पण गारांमुळे जीव मुठीत धरून परत घरात पळालो. चारा पीकांचंही मोठं नुकसान झालंय.- संदीप वरळ (शेतकरी, निघोज ता. पारनेर)
खरिपाचा हंगाम तर गेलाच पण रबीचाही पूर्ण सीझन चार तासातील गाराच्या पावसाने वाया गेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी लेट कांदा लागवड केली होती अशा शेतकऱ्यांचा सगळा कांदा वाया गेलाय. काही शेतकऱ्यांच्या तर घरच्या ६० ते ७० एकर शेतातील पीक पूर्ण वाया गेलंय. या चार तासांत ५० मिमी पेक्षा जास्त पाऊस झालाय. आम्ही अजूनपर्यंत असा पाऊस पाहिला नव्हता. - संकेत लाळगे (शेतकरी आणि युवा उद्योजक, पारनेर)