Akola Weather Today :
अकोला : गेल्या काही दिवसांपासून अपवाद वगळता पावसाने विश्रांती घेतली. तेव्हापासून शहर व जिल्ह्याच्या तापमानात रोज एक अंश सेल्सिअसने वाढ होत आहे. तापमान वाढीमुळे अकोलेकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी ३०.५ अंश सेल्सिअस असलेले तापमान ३० सप्टेंबर रोजी ३५.३ अंश सेल्सिअसपर्यंत गेले. पाच दिवसांत तापमानात चार अंश सेल्सिअसने वाढ झाली. पावसामुळे काही दिवस वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
पावसाने पाठ फिरवल्यानंतर मात्र उकाडा जाणवत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून तापमानात वाढ होत आहे. नऊ वाजता बाहेर पडलेल्या नागरिक घामाने भिजत आहेत. दुपारी उकाड्यात अधिक वाढ झाल्यामुळे नागरिकांना पंखा, कुलर पुन्हा सुरू करावे लागत आहेत.
आज (२ ऑक्टोबर) रोजी तपामानात काहीश्या प्रमाणात घट झाली आहे. आजचे तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. किमान व कमाल तापमानात वाढ झाल्याने दुपारी प्रचंड उकाडा जाणवत आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल जाणवत आहे. पारा वर चढल्याने उकाड्यात वाढ होऊन नागरिक हैराण झाले आहेत.दुपारी घराबाहेर पडल्यानंतर घामाच्या धारांनी नागरिक ओलेचिंब होत आहेत. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला आदी आजाराने डोके वर काढले आहे.शासकीय व खासगी रुग्णालये रुग्णांनी 'हाऊस फुल्ल' झाले असल्याचे दिसत आहे.
उन्हाच्या झळासप्टेंबर महिन्यात नेहमी पावसामुळे सर्वत्र गारवा निर्माण झालेला असतो. परंतु, वातावरणात अचानक बदल झाल्याने कडक ऊन जाणवत आहे. नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसांत कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्याने अनेक जणांना विविध आजार होत आहेत. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. 'ऑक्टोबर हिट'चा हा तडाखा आहे.