नाशिक जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे कोपरगाव येथे गोदावरी नदीला पाणी आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे सर्वच धरणे भरली आहेत. त्यामुळे गंगापूर धरणातून ३ हजार ३२० क्युसेकने विसर्ग करण्यात आला. कडवा धरणातून २१२ क्युसेक करंजवण ३२०, पालखेड धरणातून २१८ क्युसेक विसर्ग करण्यात आला.
दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रात १६ हजार ६६५ क्युसेक पाण्याचा विसर्ग पाटबंधारे विभागाकडून सोडण्यात आला. दुपारी बारा वाजता हाच विसर्ग घटविण्यात आला. १३ हजार ५०० क्युसेकने सायंकाळपर्यंत गोदावरीत पाणी सोडण्यात येत होते. कोपरगाव तालुक्यातही गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. शुक्रवारी झालेल्या पावसाची शनिवारी सकाळी झालेली नोंद पुढीलप्रमाणे, कोपरगाव ३२ मि.मी., दहीगाव बोलका १२ मि.मी., रवंदे २८ मि.मी. व सुरेगाव येथे २७ मि.मी. पाऊस झाला.