Join us

Almatti Dam Water Level: सगळ्यांच्या अलमट्टीकडे नजरा धरणातून तीन लाख क्युसेकने विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 11:22 AM

Almatti Dam Water Level: अलमट्टी धरणामध्ये ८८.८९ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ७२ टक्के भरले आहे. गुरुवारी कृष्णा खोऱ्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू आहे.

सांगली : अलमट्टी धरणामध्ये ८८.८९ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ७२ टक्के भरले आहे. गुरुवारी कृष्णा खोऱ्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. म्हणून अलमट्टी धरण व्यवस्थापनाने गुरुवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून तीन लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या योग्य समन्वयामुळे सांगली, कोल्हापूरच्या पुराचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील राधानगरी, दूधगंगा, वारणा वः सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात नद्यांमध्ये पाणी सोडले जात आहे.

याचा परिणाम अलमट्टी धरणामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी येण्यावर झाला आहे. अलमट्टी व्यवस्थापनानेही तातडीने हालचाली करत अलमट्टीतून होणारा पाण्याचा विसर्ग सव्वा दोन लाख क्युसेकपर्यंत बुधवारी वाढवला होता. गेल्या दोन दिवसांपासून समन्वयाने पाणी सोडणे सुरू असल्याने पूरस्थिती अजूनही नियंत्रणात असल्याचे चित्र आहे.

धरण क्षेत्रासह सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. म्हणून गुरुवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून २१ हजार ५० क्युसेक तर वारणा धरणातून १० हजार ४६० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. यामुळे सध्या अलमट्टी धरणात १ लाख ७६ हजार ४६६ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. म्हणून धरणातून तीन लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

कृष्णा नदी (कल्लोळ बॅरेज) आणि घटप्रभा नदी (लोलासूर पूल) येथून होणारा विसर्ग लक्षात घेता अलमट्टी धरणातील पाण्याची आवक वाढत चालली आहे. त्यामुळे नदीकडे जाणारा प्रवाह २ लाख ७५ हजार क्युसेकवरून सायंकाळीनंतर ३ लाख क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सांगली, कोल्हापूरच्या नागरिकांचे अलमट्टीकडे लक्षसांगली, कोल्हापूर जिल्ह्याला अलमट्टी धरणामुळे महापुराचा धोका आहे, नागरिकांमध्ये चर्चा आहे. यामुळे सध्या दोन्ही जिल्ह्यातील असे लोकप्रतिनिधींपासून नागरिकांपर्यंत अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्याकडे लक्ष आहे. काँग्रेसचे खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत अलमट्टीच्या धरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन अलमट्टीतून पाणी सोडण्याची मागणी केली.

टॅग्स :धरणपाणीकोल्हापूरपूरकोल्हापूर पूरकर्नाटक