Join us

राज्यात किमान तापमान घसरले असले तरी सरासरीहून अधिक

By मुक्ता सरदेशमुख | Published: December 19, 2023 8:00 PM

परभणी व उदगीर मध्ये 13.5° सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा प्रभाव वाढल्याने महाराष्ट्रातही गारठा जाणवू लागला आहे. किमान तापमानात घट जाणवत असली तरी कमाल तापमान चढेच असल्याचे हवामान खात्याने दिलेल्या हवामान अहवालात दिसून येते. 

मध्य महाराष्ट्रात किमान तापमान तसेच सरासरीच्या वरच असल्याचे हवामान विभागाने सांगितले. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी असल्याचे दिसून आले.

सध्या हिमालयीन भागात चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये गारठ्यासह धुक्याची चादर पसरली आहे. तर दक्षिणेतील तमिळनाडू, पुदुचेरी राज्यात हलक्या पावसाची नोंद झाली. पुढील चार ते पाच दिवस देशातील अनेक भागात किमान तापमानात फारसा फरक पडणार नसल्याचेही हवामान विभागाने सांगितले.

दरम्यान आज परभणी व उदगीर मध्ये 13.5° सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान 14° पर्यंत पोहोचले होते तर कमाल तापमान 24.7 अंश सेल्सिअस होते. मागील चार दिवसांपेक्षा तापमानात किंचित वाढ दिसून येत आहे. कोकणात कमाल व किमान तापमान उर्वरित राज्यापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. जळगाव व औरंगाबाद मध्ये 14.4 अंश व 15.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

टॅग्स :हवामानतापमान